न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- महापालिकेच्या पाणीपुरवठा धोरणानुसार झोपडपट्ट्यांमधील निवासी नळजोड व सार्वजनिक नळ कोंडाळ्यांचे पाणीदर निश्चित केले आहेत. तसेच, अनधिकृत नळजोड नियमित करण्याची मोहीमही अवलंबली आहे. त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळण्यासाठी नळजोड घेण्यासाठीची अनामत रक्कम, दंडाची रक्कम व पाणीपट्टीची रक्कम कमी केली आहे.
बहुतांश झोपडपट्ट्यांमधील नळांना मीटर बसविण्यात आले आहेत. त्यांचे पाणीदर निश्चित केलेले आहेत. मात्र, नळजोडांना मीटर नसलेले, मीटर बंद असलेले किंवा रीडिंग घेता येत नसलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील नळजोडधारकांकडून दरमहा सरासरी ३५ रुपये, तर झोपडपट्टीतील वैयक्तिक नळजोडधारक कुटुंबाकडून दरमहा १५ रुपये पाणीपट्टी निश्चित केलेली आहे.
सार्वजनिक नळकोंडाळ्यांवरून पाणी भरणा-या पाच कुटुंबाच्या गटाकडून दरमहा ४५ रुपये पाणीपट्टी निश्चित केलेली आहे. तरीही बहुतांश व्यक्ती अनधिकृतपणे नळजोड घेऊन पाणी चोरून वापरत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महापालिकेने कठोर पावले उचलली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करून प्रशासकीय कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिका-यांना दिला आहे.
















