- हल्लेखोरांच्या तावडीतून जेष्ठ नागरिकाची सुटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२०) :- आकुर्डी रेल्वे स्थानकाचा सध्याच्या काळात गुन्हेगार, भुरटे चोर, पाकीटमार, गर्दुले यांनी पूर्णतः ताबा घेतल्याचे दिसून येत आहे. संध्याकाळ झाली की त्यांचा सुळसुळाट सुरू होतो. रेल्वे प्रवाश्यांवर हल्ले होणे तसेच पाकिटमारीही नित्यानेच घडत आहे.अनेक प्रवाश्यांनवर घातक शस्त्राने हल्ले होत आहेत. प्रवाश्यानीं मदत मागितल्यास किंवा स्टेशन मास्तरांनी फोन केल्यास प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पोलीस मित्र – स्वयंसेवक तातडीने प्रवाश्यानां मदतीचा हात देत असतात. परंतु सुरक्षा समितीचे पोलीस मित्र – एस पी ओ २४ तास सुरक्षा देऊ शकत नाहीत. त्याकरिता रेल्वे पोलीसांनी तातडीने जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस रेल्वे स्थानक प्रवाश्यांना असुरक्षित बनत चालले आहे.
गुरुवारी रात्री ९.०० वा रेल्वे स्थानकावर एक जेष्ठ प्रवाश्यावर ४ गर्दुल्ल्यानी लुटमारीकरिता हल्ला केला असल्याचा एका स्थानिक प्रवाश्यानी समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांना मोबाइल फोन द्वारे कळविले, त्यांनी तात्काळ समितीचे पोलिस मित्र संतोष चव्हाण, अजय लुगडे, अमोल कानु यांना मदतीकरिता एक नं. प्लॅटफॉर्म वर पाठविले पोलीस मित्र पोहचताच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. पोलीस मित्रांनी तातडीने त्यांना मदत केली व प्रथोमोपचार दिले. हल्ला झाल्यामुळे बाबू तुळशीराम सूर्यवंशी (वय – ७०) राहणार, ताटे चाळ दापोडी किरकोळ जखमी झाले होते. त्यांनी पोलीस मित्रांच्या या मदतीबद्दल आभार मानले. सदरच्या घटनेबद्दल समिती पोलीस मित्रांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सूचित केले. प्लॅटफॉर्मवर उपस्थित प्रवाशयांनीही समिती पोलिस मित्रांनसमोर अनेक तक्रारींचा पाढा वाचला. दरोराज सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे प्रवाशी सुद्धा हैराण झालेले दिसून आले.
या बाबत प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, “सध्याच्या काळात आकुर्डी रेल्वे स्थानक अतिशय धोकादायक व असुरक्षित बनलेले आहे. प्रवाश्यांची सुरक्षा तर रामभरोसेच आहे. रात्रीच्या सुमारास प्लॅटफॉर्मच्या निर्जन बाजूस एकट्याने कृपया जाणे टाळावे. मोबाईल हिसकावणे, पाकिटमारी, लुटालूट असे दरोरोज सर्रास प्रकार सध्या स्थानकावर घडत आहेत. त्यामुळे स्वतःचे संरक्षण करणेच रास्त ठरेल. सावध व दक्ष राहूनच संध्याकाळच्या वेळेस प्रवास करावा, रात्री उशिरा प्रवास करणे टाळावे. रेल्वे प्रशासनाने तातडीने सुरक्षा उपाय करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रेल्वे पोलीस ठाणे सुद्धा तातडीने कार्यरत करणे आवश्यक आहे.”















