- राष्ट्रवादी कार्यकर्ते संदीप काटे यांच्या मागणीस हिरवा कंदील ?
- व्यावसायिकांच्या सकारात्मक भूमिकेची सरकारला प्रतिक्षा ?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२०) :- मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळात नुकताच घेण्यात आला व त्याची अंमलबजावणी देखील सुरु झाली. मुंबई नाईट लाईफचा राज्य मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय पुणे व पिंपरी चिंचवड शहरासाठीही देखील लागू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपळे सौदागर येथील कार्यकर्ते संदीप काटे यांनी राज्य शासनाकडे नुकतीच केली होती. याबाबत राज्य शासन सकारात्मक भूमिकेत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार एका खासगी कार्यक्रमानिमित्त वाकड परिसरात आले असता, त्यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरात नाईट लाईफ राबविण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली.
मुंबई नाईट लाईफचा राज्य मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय पुणे शहरासाठीही लागू करावा. कारण, मुंबईनंतर राज्यात पुणे द्वितीय क्रमांकाचे शहर गणले जाते. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कॅम्प, मगरपट्टा सिटी, हिंजवडी, वाकड, पिंपरी, बाणेर, कोथरूड, हडपसर, औंध, वाकड, शिवाजीनगर, कोरोगाव पार्क, खराडी, विमाननगर, कर्वेनगर, स्वारगेट, कल्याणीनगर, एफसी रोड, येरवडा आदी भागात आयटी पार्क, ट्रान्सपोर्टेशन, एक्सपोर्ट-इम्पोर्ट, ट्राव्हल्स अशा अनेक क्षेत्रातील कंपन्या रात्रपाळीत चालतात. पुणे हे रात्रीसुध्दा मुंबईप्रमाणे कार्यरत राहणारे शहर आहे.पिंपरी चिंचवड ही उद्योगनगरी आहे. इथे राज्यातूनच नव्हे, तर देशभरातून लोक पोटा-पाण्यासाठी आले आहेत. अनेक ठिकाणी अनेक कामगार तीन पाळीमध्ये काम करीत आहेत. आयटी पार्कमध्ये महिला युवती काम करतात. त्यांच्यासाठी खाणे पिणे, वाहतूक अशी काही व्यवस्था असणे गरजेचे आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहरात नाईट लाईफ धोरण राबविणे अगदी मुंबई शहरापेक्षा सोपे आहे. नियोजन व पूर्वतयारी यांच्या माध्यमातून निश्चितच पुणे व पिंपरी चिंचवड शहर नाईट लाईफबाबत आदर्श असे ठिकाण असेल.– संदीप काटे, राष्ट्रवादी कार्यकर्ते, पिंपरी-चिंचवड















