न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणीपट्टी न भरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. त्यानुसार आठ क्षेत्रीय कार्यालयांनी पाणीपट्टी थकबाकीदारांची यादी बनविली आहे. थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सात दिवसांच्या आत थकीत पाणीपट्टी न भरल्यास संबंधित ग्राहकाचा नळजोड तोडण्याची कारवाई केली जाणार आहे.
पालिकेच्या सर्व विभागांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उत्पन्न वाढविण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. पाणीपुरवठा विभागाची मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. अनेक सरकारी व शासकीय संस्था आणि कार्यालये, पोलिस ठाणे, शैक्षणिक व व्यापारी संस्था, खासगी कंपन्या आदींकडे पाणीपट्टीचे बिल थकले आहे.
पाणीपुरवठा विभागाची थकबाकी रक्कम तब्बल ६० कोटी ३९ लाख रुपये आहे. त्यांनी ही रक्कम वसुल करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. चिखली, मोशी, भोसरी आणि पिंपरी या भागातून सुमारे १० कोटी १९ लाख रुपयांची थकबाकी येणे बाकी आहे. चिंचवड , रावेत , काळेवाडी या भागातून ८ कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे.
थकबाकीदारांनी पाणीपट्टी भरून कारवाई टाळावी. थकबाकीदार ग्राहकांनी पाणीपट्टीची बिले तत्काळ भरावीत. थकबाकी न भरल्यास तातडीने नळजोड खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे. प्रसंगी फौजदारी कारवाईदेखील संबंधितांवर केली जाईल. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी बिले भरून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी केले आहे.















