न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ फेब्रुवारी २०२०) :- कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा रुग्णालय व पिंपरी – चिंचवड महापालिका सज्ज झाल्या आहेत. जिल्हा रुग्णालयांमध्ये अशा संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) तात्पुरती सुविधा करण्यात आली आहे.
करोना आजाराबाबत अफवांवर विश्वास न ठेवता काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. साध्या सुध्या सर्दी, खोकल्यापासून गंभीर आजारास कारणीभूत ठरणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या विषाणूला कोरोना विषाणू म्हटले जात आहे. शिकणे यासह हवेमार्फत या आजाराचा प्रसार होत असावा अशी प्राथमिक माहिती आहे. हा विषाणू प्राणिजन्य असला तरी नक्की कोणत्या प्राण्यांपासून पसरत आहे, या बाबत माहिती नसल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले.
सध्या चीनमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे चीनमधून पुण्यात येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर नवी सांगवी येथील रुग्णालय सज्ज झाले आहे. रुग्णालयात स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. चार बेडचा हा विभाग बनविण्यात आला आहे. बाहेरचा प्रवासी संयशित असेल तर त्याला या विभागात दाखल केले जाणार आहे. त्यानंतर पुढील उपचाराची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला शासनाने कोरोना आजाराबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आमची बैठक झाली आहे. काय काळजी घ्यावी, सुविधा कोणत्या द्याव्यात याबाबत महापालिका रुग्णालयात संबंधितांना आम्ही सुचना दिल्या आहेत, असे महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.















