न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक १२ मधील गृहप्रकल्पात एक हजार घरांचे आरसीसी बांधकाम आत्तापर्यंत पूर्ण झाले आहे. या गृहप्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी २०२१ उजाडणार आहे. तथापि, गृहप्रकल्पाची ” रेरा ‘ अंतर्गत नोंदणी झाल्यानंतर चालू वर्षी मार्च आणि एप्रिलपर्यंत प्रकल्पातील घरांसाठी अर्ज मागविले जाणार आहेत.
या गृहप्रकल्पात सर्वसामान्य नागरिकांना अवघ्या दहा लाख रुपयांमध्ये घर मिळणार आहे. पेठ क्रमांक १२ मधील एकूण ५२ हेक्टर क्षेत्रापैकी ९. ४३ हेक्टर क्षेत्रावर गृहयोजना साकारते आहे. या गृहप्रकल्पात आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील नागरिकांना ३ हजार ३१७ सदनिका आणि अल्प उत्पन्न गटासाठी ४ हजार ५६६ सदनिका उभारल्या जाणार आहेत.
प्रकल्पातील वन बीएचके सदनिका ९. ९० लाखापर्यंत उपलब्ध होणार आहे. गृहप्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी २० फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उभारण्यात येणाऱ्या वन बीएचके सदनिकेचे कार्पेट क्षेत्र ३१७. ५३ चौरस फूट इतके असणार आहे. या प्रकल्पासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत अनुदान मिळणार आहे, अशी माहिती प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता, प्राधिकरण व आशाराणी पाटील, उप – मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण यांनी दिली.