न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२०) :- भरधाव आलेल्या ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने कारमधील दोघांचा मृत्यू झाला ; तर दोन जण जखमी झाले आहेत. रविवारी (दि. १६) रात्री साडे अकराच्या सुमारास पुणे – नाशिक महामार्गावर मोशी येथे हा अपघात झाला. रघुवीर बाबूराव भावसार आणि दि मोहन भागन्ना माळवदकर असे मृत्यू व झालेल्या दोघांची नावे आहेत.
तर, दम प्रल्हाद रामू आंगळे व आनंद श्रीराम भावसार हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी मंगेश देवराम कदम यांनी सोमवारी (दि. १७) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रघुवीर भावसार, मोहन माळवदकर, प्रल्हाद आंगळे व आनंद भावसार हे चौघे कारमधून जात होते. दरम्यान, मोशी येथील जुना जकात नाका चौकाजवळ भरधाव ट्रकने त्यांच्या कारला पाठीमागून धडक दिली. यामध्ये रघुवीर भावसार व मोहन माळवदकर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच प्रल्हाद आंगळे व आनंद भावसार हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळी न थांबता तसेच अपघाताची पोलिसांना माहिती न देता निघून गेला. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलिस करीत आहेत.