न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२०) :- शहरात ३० मीटर रूंदीच्या सुमारे ३० किलोमीटर अंतराचा एचसीएमटीआर ( रिंग रोड ) वर्तुळाकार मार्ग तयार करण्यात येणार आहे. संपूर्ण शहर बीआरटी, मेट्रो व रिंग रोड निओ मेट्रोने जोडले जाणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ( मोबॅलिटी ) अधिक सक्षम होऊन खासगी वाहनांचा वापर करून वायू व ध्वनी प्रदूषण घटणार आहे, असा दावा आयुक्त हर्डीकर यांनी केला आहे.
शहरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था योग्य राहील याचा सखोल अभ्यास करून सविस्तर प्रकल्प अहवाल ( डीपीआर ) तयार करण्याचे काम महामेट्रोकडून सुरू आहे. नाशिक महापालिकाही या प्रकाराचा डीपीआर तयार करीत आहे.
कासारवाडी , पिंपळे गुरव , पिंपळे सौदागर , कोकणे चौक , रहाटणी , काळेवाडी फाटा , तापकीर चौक , थेरगाव , पदमजी पेपर मिल , वाल्हेकरवाडी , आकुर्डी रेल्वे स्थानक , भक्ती – शक्ती समुह शिल्प चौक , स्पाईन रस्ता , इंद्रायणीनगर कॉर्नर , सेंच्युरी एन्का कंपनी , लांडेवाडी , नाशिक फाटा , कासारवाडी , असा नवा सुधारित मार्ग आहे.
या मार्गावर रबर टायर्ड इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन सुविधा असणारे निओ मेट्रो असणार आहे. त्यासाठी उन्नत मार्ग ( एलिव्हेटेड ) वाहतूक मार्गिका तयार केली जाणार आहे. एका निओ मेट्रोतून २०० ते २५० प्रवासी एकावेळी ये – जा करू शकतात. प्रवासी संख्या १० हजारांच्या पुढे गेल्यास केवळ रूळ टाकून मेट्रो वाहतूक सुरू करता येणार आहे. निओ मेट्रो मार्गासाठी ३० ते ४० टक्के खर्चात बचत होणार आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
रिंग रोड नाशिक फाटा ते चाकण मेट्रोला जोडली जाणार आहे. त्या मार्गावरही निओ मेट्रोचे नियोजन आहे. केंद्र व राज्य शासनाचे अनुदान घेऊन की खासगी तत्वावर रिंग रोडचा प्रकल्प राबवायचा त्यावर महापालिका सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन कार्यवाही केली जाणार आहे. भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन बीआरटी, मेट्रो आणि रिंग रोड एकमेकांना जोडून सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे, असा दावा आयुक्तांनी केला. तसेच ३५० ई – बस खरेदी केले जाणार असून, त्यासाठी अर्थसंकल्पात तब्बल ९५ कोर्टीची निविदा अंतिम टप्प्यात आहे. निधी महापालिका देणार असून संचलन तूट महापालिका देत आहे. या बसमुळे बीआरटी अधिक सक्षम होणार आहे.