न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२०) :- कष्टकरी जनतेच्या वतीने पिंपरीत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कष्टकरी कामगार पंचायत आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायतिच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कष्टकरी महिला जयश्री काटकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, स्वयंसेवी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष संदीपन झोबडे, बळीराम काकडे, प्रल्हाद कांबळे आदी उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले, बारा-बलुतेदार, कष्टकरी जनतेला खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहामध्ये आणून, त्यांना सन्मान मिळवून देण्याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जाते. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीसाठी सर्व रयत व कष्टकऱ्यांनीही जीवाची बाजी लावली. रयतेच्या व कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड संघर्ष केला. रयतेचे व कष्टकऱ्यांचे राज्य प्रस्थापित व्हावे, असं स्वप्न उराशी बाळगून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा लढा लढला व तो जिंकलासुद्धा.















