- महापालिकेची महासभा श्रद्धांजली विषयावरून थेट हमरीतुमरीवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२०) :- हिंगणघाट, जळीतकांड प्रकरण आणि महिला असुरक्षितेच्या मुद्यावरून सुरू असलेल्या चर्चेला पिंपरी – चिंचवड महापालिका महासभेत गुरुवारी (दि. २०) रोजी राजकीय वळण मिळाले. भाजप नेते एकनाथ पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडीची तुलना थेट औरंगजेबाशी केली. यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
हिंगणघाट पीडिता आणि महिला असुरक्षिततेचा मुद्दा सोडून या नगरसेवकांनी राजकीय कलगीतुरा करत असंवेदनशीलतेचा कळस गाठत सभागृहाचे कामगाज कोणत्या थरापर्यंत घसरले हे देखील दाखवून दिले. महापौर माई ढोरे सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. सर्वसाधारण सभेत महापालिका स्थायी समितीच्या रिक्त होणाऱ्या सदस्यांची नियुक्ती केली जाणार होती. परंतु, सत्ताधारी भाजपने श्रद्धांजली वाहण्यासाठी हिंगणघाट जळीतकांड प्रकरणावरून चर्चेला सुरूवात केली.
भाजप नगरसेवक प्रियंका बारसे, माया बारणे, सुजाता पलांडे, स्वीनल म्हेत्रे, आशा शेंडगे, सीमा सावळे यांनी या जळीतकांडाच्या निमित्ताने अत्याचार, महिलांच्या छेडछाडीचे प्रकार वाढल्यावरून राज्य सरकारला जबाबदार धरले. या घटना रोखण्यासाठी शहरात उपाययोजना करण्याच्या सुचनाही केल्या. दरम्यान, भाजपच्या बाळासाहेब ओव्हाळ नी यांनी या प्रकरणावरून थेट मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
त्यानंतर राष्ट्रवादीच्या मंगला कदम, वैशाली घोडेकर , दत्ता साने , भाऊसाहेब भोईर यांनी राज्यातील सत्ताबदलामुळे भाजपचा सभागृहातील सूर बदलल्याचे सांगत राजकारण न करण्याचे आवाहन केले. परंतु, एकनाथ पवार यांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली. छत्रपती शिवाजी महारांजाचे नाव घेऊन सत्तेत आलेले सरकार औरंगजेबासारखे सत्ता चालवत असल्याचा प्रहार त्यांनी केला. त्यामुळे हा वाद अजूनच वाढला.
शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे, विरोधी पक्षनेते नाना काटे व अजित गव्हाणे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढविला. त्यामुळे हा वाद वाढत जाऊन महासभा तहकूब करण्यात आली. हिंगणघाट पिडीतेला न्याय मिळवून देण्यावरून सुरू असलेली चर्चा भरकटली. शिवसेनेकडून राहूल कलाटे , मीनल यादव यांनी उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजप आमदार कुलदीप सेंगर यांची आठवण भाजपला करून दिली. तसेच, मीनल यादव, दत्ता साने यांनी भाजप आमदार राम कदम यांनी मुलींना पळवून नेण्याबाबत दिलेला सल्ला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सांगितला. या सगळ्यामुळे महिला सुरक्षिततेचा मुद्दा बाजुला ठेवून या नगरसेवकांनी राजकीय वाद घातला. सभागृहात अतिशय संवेदनशील विषयावर चर्चा सुरू असल्याचे भानही सर्वांनीच सोडून दिल्याचे पहावयास मिळाले.
महापौर भाजपचे नगरसेवक राजकीय वक्तव्य करत असताना त्यांना थांबवत नाहीत . त्यांनी चर्चा कितीही भरकटवली किंवा कोणतेही मुद्दे मांडले तरी चालतात . मात्र विरोधी नगरसेवक काही बोलले तर महापौर त्यांना : तात्काळ खाली बसण्याची सूचना करतात . महापौरांनी अशाप्रकारे वागणे – चुकीचे आहे . ते एका पक्षाचे महापौर नसून शहराचे प्रथम नागरिक आहेत . त्यांनी सर्व पक्षांना सारखे वागवले पाहिजे . अशाप्रकारे दुजाभाव करणे म योग्य नसल्याचे सांगत राहूल कलाटे य यांनी महापौरांवर शिरसंधान साधले .











