- महापालिकेची सर्वसाधारण सभा २६ फेब्रुवारीपर्यंत तहकूब…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची नियुक्ती गुरुवारी ( दि . २० ) झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात येणार होती. मात्र, नावे निश्चितच न झाल्यामुळे ही सभा तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपावर आली. आठपैकी सहा सदस्य भाजपाच्या कोट्यातील असून अंतर्गत वाद आणि इच्छुकांची भाऊगर्दी तसेच सदस्यपदाचा कालावधी एक की दोन वर्षाचा यावर अंतिम निर्णय न झाल्यामुळे भाजपातील अंतर्गत कलह शिगेला पोहोचल्याची चर्चा रंगली आहे.
पिंपरी – चिंचवडमहापालिकेच्या स्थायी समितीमधील ८ सदस्यांची मुदत संपुष्टात आली आहे. आठ सदस्यांमध्ये भाजपचे सहा तर राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेसमोर स्थायीच्या सदस्यांच्या निवडीचा पहिल्याच क्रमांकाचा प्रस्ताव होता. सहा जागा आणि इच्छुकांची भाऊगर्दी त्यातच चिंचवड आणि भोसरी बरोबरच निष्ठावंत आणि आयाराम अशा स्तरावर भाजपाची विभागणी झाल्यामुळे सहा सदस्यांबाबत गुरुवारी अंतिम निर्णय होऊ शकला नाही. पहिलाच विषय हा सदस्य निवडीचा असल्यामुळे आजची सभा २६ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे तब्बल ७७ नगरसेवक आहेत. भाजपामध्ये आमदार महेश लांडगे व आमदार लक्ष्मण जगताप यांचे दोन गट आहेत. तर निष्ठावंतांचा तिसरा गट कार्यरत आहे. तीनही गटातील इच्छुकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे वर्णी कोणाची लावायची प्रश्नही नेत्यांसमोर आहे. इच्छुकांचा तगादा, राज्यातील बदलेले सरकार, आक्रमक झालेली राष्ट्रवादी आणि दोन वर्षांवर आलेली महापालिका निवडणूक याबाबी समोर ठेवून स्थानिक नेते कोणाला संधी देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.











