न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२०) :- भाजपने सत्तेवर असताना राज्यभरात ३३ कोटी वृक्ष लागवड केल्याचा दावा केला होता. ही वृक्ष लागवड झाली नसल्याची शंका घेत महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांनी वृक्ष लागवडीचे चौकशीचे आदेश दिले आहेत. आमदार जगताप यांना या प्रश्नी विचारले असता ते म्हणाले महापालिकेने दीड लाख झाडे लावली आहेत. तसेच या झाडांचे पाच वर्ष संवर्धन करण्याचे काम संबंधित ठेकेदाराचे आहे. त्यामुळे सरकारला पालिकेने लावलेल्या झाडांची चौकशी करायची असेल तर जरूर करावी.
त्याचबरोबर महापालिकेतील तीन वर्षाच्या कारभाराची चौकशी करावी. आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. आमचा एकही पदाधिकारी कशातच सापडणार नाही, असे खुले आव्हान जगताप यांनी राज्य सरकारला दिले आहे.
पिंपरीतील मोरवाडी येथे भाजपच्या पक्ष कार्यालयात आज (शनिवारी) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप व आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार जगताप बोलत होते.















