न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२०) :- दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी १७ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना भोसरी येथे बुधवारी (दि. १९) सकाळी उघडकीस आली. विशाल भागाजी निमसे (वय ३२, रा. महादेव नगर, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी बुधवारी (दि. १९) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
निमसे यांचे आळंदी रोडवर मोबाइल विक्रीचे दुकान आहे. मंगळवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. बुधवारी सकाळी त्यांना दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आतील १६ लाख २५ हजार रुपये किंमतीचे १३७ मोबाईल फोन आणि एक लाख ४७ हजारांची रोख रक्कम असा एकूण १७ लाख ७२ हजारांचा ऐवज चोरून नेला.


















