- नगरसेवकांची कार्यालयेच पाडायची झाल्यास सर्वप्रथम आमदारांच्या कार्यालयाचा सर्व्हे व्हावा – नाना काटे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२०) :- पिंपळे सौदागर येथील शिवांगण सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील जनसंपर्क कार्यालय हे बांधकाम परवानगी नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आले आहे. इमारतीच्या सामासिक अंतरात ( साईड मार्जिन ) जनसंपर्क कार्यालय आणि पत्र्याचे शेड बेकायदेशीरपणे थाटणाऱ्या नाना काटे आणि शीतल काटे यांचे नगरसेवक पद तातडीने रद्द करा, बेकायदेशीर कार्यालय जमीनदोस्त करा अन्यथा न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा भाजपा नगरसेविका तथा स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम १० ( १ ड ) नसार नगरसेवकाने किंवा त्याच्या नातलगाने अनधिकृत बांधकाम केल्यास त्याचे नगरसेवक पद रद्द करण्याची कायदेशीर तरतूद आहे. या कायद्यानुसार नाना काटे आणि शीतल काटे हे दोघेही नगरसेवकपदी राहण्यास अपात्र ठरत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या राहत्या घरावर बुलडोझर फिरवते. मात्र , विरोधी पक्षनेते असलेल्या नाना काटे यांच्या राजकीय दहशतीमुळे महापालिका प्रशासन पाडापाडी कारवाई करायला आयुक्त धजावत नाहीत, ही संतापाची बाब आहे. महापालिका आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेऊन बेकायदेशीरपणे उभारलेले जनसंपर्क कार्यालय तातडीने पाडावे, तसेच काटे दाम्पत्याचे नगरसेवकपद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, असा इशारा नगरसेविका सीमा सावळे यांनी दिला आहे.
विरोधी पक्षनेते नाना काटे यांची प्रतिक्रिया :-
याबाबत पलटवार करताना विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे म्हणाले की, महापालिका आयुक्तांना झालेल्या शिविगाळसंदर्भात आम्ही एक पत्र आयुक्तांना दिले असून, शिविगाळ करणाऱ्या नगरसेविकेवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या मागणीचा राग आल्यामुळेच कदाचित सावळे यांनी आयुक्तांना निवेदन दिले असावे.
नगरसेवकांची जनसंपर्क कार्यालयेच पाडायची असल्यास पहिल्यांदा भाजपाच्या नगरसेवकांच्या कार्यालयाचा सर्व्हे करावा आणि निर्णय घ्यावा. तसेच आमदारांच्या कार्यालयाचाही सर्व्हे करावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.












