न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२०) :- हिंगणघाट येथे झालेल्या दुर्दैवी घटनेचे भाजपाने चालविलेले राजकारण हे खेदजनक आणि संताप निर्माण करणारे असल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यस्था तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता फसवणूक केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी आकुर्डी येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे संजोग वाघेरे यांनी टीका केली आहे. वाघेरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्यात भाजपाचे सरकार होते. या सरकारच्या काळात राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री मिळाला नाही. पाच वर्षांच्या काळात राज्यातील कायदा व सुव्यस्थेचे दिवाळे निघाले होते. मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपूरचा क्राईमरेट संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक होता. पिंपरी – चिंचवड शहरात आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर १५ ऑगस्ट २०१८ ते १५ ऑगस्ट २०१९ या कालावधीत १२ हजार गुन्हे घडले. खून , दरोडे , अवैध धंदे , बलात्कार या सारख्या घटनांमुळे देशातील असुरक्षित राज्य म्हणून महाराष्ट्राचा वरचा ८ क्रमांक असल्याचे केंद्राच्या अहवालात नमूद करण्यात आले. या काळात आंदोलन करणाऱ्या एकाही नेत्याला तोंड उघडून विरोध करता आला नाही. ज्या पक्षाचा आमदार तरुणीवर बलात्कार करतो, तिच्या कुटुंबीयांच्या सदस्यांची हत्या करतो, त्या पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी कायदा सुव्यवस्थेची भाषा करतात हा मोठा विनोदच असल्याचेही वाघेरे यांनी म्हटले आहे.
हिंगणघाटची घटना दुर्दैवी असून राज्याचे गृहमंत्री दोनवेळा पीडितीच्या कुटुंबीयांना भेटले आहेत. आरोपीला अटक करून पीडितेला न्याय देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. तेलंगणाच्या धर्तीवर राज्यात कडक कायदा करून गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण गृहमंत्रालय कामाला लागले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांना आवश्यक ती मदत केली जात आहे. मात्र, भाजपाला या दुर्दैवी घटनेवरही आंदोलन करून राजकीय पोळी भाजायची आहे ही बाबच खेदजनक आहे. राजकारण कोणत्या गोष्टीचे करावे याचे भान त्यांनी ठेवायला हवे, असेही वाघेरे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


















