- जुन्या-जाणत्यांना सत्ताधाऱ्यांचे चक्रव्युव्ह भेदण्यात अपयश
- शहर राष्ट्रवादीची नव्या-दम्याच्या कार्यकर्त्यांसह नव्याने पक्षबांधणी आवश्यक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची सन २०२२ ची निवडणूक अवघ्या दोन वर्षांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शहराध्यक्ष बदलला. त्या पक्षाचे पक्षश्रेष्ठी कार्यकारणीतही लवकरच अमुलाग्र बदल करण्याच्या तयारीत आहेत. तरीही, प्रतिस्पर्धी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीत मात्र चिडीचूप वातावरण आहे. ‘’गावकी- भावकी आणि मर्जीचे राजकारण’’ अशा खुळचट भूमिकेमुळे शहरात पक्षाची वाताहत झाली आहे. त्यामुळे कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत असून, विद्यमान पदाधिका-यांच्या प्रभावी नेतृत्वाअभावी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस ‘पिछाडीवर’ गेल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकीच्या भूमिकेमुळे २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता भाजपच्या हाती गेली. त्यानंतर पक्षाला अक्षरशः घरघर लागली असून, ज्यांनी पक्ष संघटनेतील मोठमोठी पदे घेतली. तेच आता महापालिकेतील सत्ताधारी भाजपसोबत मॅनेज होताना दिसत आहेत. निविदा न भरता थेट पध्दतीने कामे मिळवण्यासाठी सत्ताधा-यांपुढे लोटांगण घातले जात आहे. याकडे राष्ट्रवादीच्या प्रदेश नेतृत्वाचे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरातील पदाधिका-यांना मोकळे रान मिळाले आहे. गावकी भावकीच्या राजकारणाचा धागा पकडून अर्थपूर्ण संबंध जोपासले जात आहेत. पदाधिका-यांनी स्वतःच्या हितासाठी पातळी सोडून वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी ठेवल्याने पक्ष रसातळाला पोहोचला आहे. एकीकडे शास्तीकर, अनधिकृत बांधकाम, रेडझोन, रिंग रोड, दिवसाआड पाणीपुरवठा, मिळकत करवाढ, वाढीव निविदा घोटाळा यासारख्या समस्यांनी शहराला ग्रासले असतानाही प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीला सत्ताधाऱ्यांचे चक्रव्युव्ह भेदण्यात अपयश आलेले दिसते. यात सुखावह बाब एवढीच की काही नव्या दम्याच्या कार्यकर्त्यांचा पक्षात उदय होताना दिसत आहे. शहरातील जनतेचे प्रश्न उपस्थित करण्यात पक्षाकडून आता नवीन कार्यकर्ते आघाडी घेताना दिसत आहेत.
राष्ट्रवादीने चिंचवड विधानसभेत भरमसाठ लोकांना पदे दिली आहेत. मात्र, पक्षाला वर आणणारे एकही प्रभावी नेतृत्व अद्याप तयार झाले नाही. याचा प्रत्यय पक्षाला लोकसभा निवडणुकीत आलेलाच आहे. विधानसभा निवडणुकीतही तगडा उमेदवार नसल्यामुळे पक्षाने ऐनवेळी एकाला दिलेला अर्ज बाद करण्याचे नाट्य रचावे लागले. एकंदरीत पक्षाकडे आशादायी नेतृत्व नसल्यामुळे चिंचवड विधानसभेत पक्षाची पुरती वाट लागलेली आहे. विशेष बाब म्हणजे पक्षातील सर्वात मोठी पदे ही चिंचवड विधानसभेत दिली आहेत. मात्र, त्याचा पक्षाला तसुभरही फायदा होताना दिसत नाही.
याउलट याच मतदारसंघातील पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पुनावळे, वाकड, चिंचवड व इतर परिसरातून अनेक नवखे कार्यकर्ते कोणताही अनुभव नसताना पक्षाची धुरा स्वतः हाती घेत, शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या समस्यांना पक्षाच्या माध्यमातून पटलावर आणू पाहत आहेत. विशेष म्हणजे या कार्यकर्त्यांनी मांडलेल्या या समस्यांची दखलही घेतली जाताना दिसत आहे. मात्र, शहरातील जुन्या-जाणत्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या पाठीवर जी कौतुकाची थाप मिळावयास हवी, त्यांना पुढील दिशादर्शन व मार्गदर्शन मिळावयास हवे, ते मिळताना दिसत नाही. त्यामुळे संभ्रमावस्थेत असणाऱ्या या तरुण कार्यकर्त्यांनी कोणाचा आदर्श घ्यायचा. त्यांची पुढील दिशा, अजेंडा काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही बाब पक्षाच्या वरीष्ठ पातळीवरील नेत्यांकडून गांभिर्याने घेतली जात नसल्यामुळे पक्षाच्या ऱ्हासाचे द्योतक ठरत आहे. परिणामी, चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस ‘बॅकफुट’वर गेली आहे. त्यामुळे पक्षवाढीची धुरा आता नवीन कार्यकर्त्यांच्या खांद्यावर आली आहे. मात्र, त्यासाठी नव्याने पक्षसंघटन बांधणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी पक्षश्रेष्ठींनी दखल घ्यायला हवी. नव्याने पक्ष संघटन तयार करून, या नवीन कार्यकर्त्यांना ताकद देणे गरजेचे आहे. अन्यथा हाततोंडाशी आलेला घास म्हणजेच २०२२ च्या महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा पक्षाचा पराभव होणे अटळ आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३७ नगरसेवक आहेत. त्यातील काहींजण चिंचवड विधानसभेतील रहिवासी आहेत. विरोधी पक्षनेते पद, युवक अध्यक्षपद, विद्यार्थी संघटनपद, कार्याध्यक्षपद, प्रदेश युवकचे सरचिटणीसपद, चिंचवड विधानसभा अध्यक्षपद यासारखी अनेक महत्वाची पद याच मतदारसंघाकडे आहेत. वास्तविक परिस्थिती पाहता सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या कामावर ही पदं भोगणाऱ्या एकाही पदाधिकाऱ्याकडून प्रभावी विरोध होताना दिसत नाही, असा निष्कर्ष राजकीय जाणकार मांडत आहेत.















