- सत्ता गेल्यानंतर ५० दिवसातच भाजपला गुन्हेगारी वाढल्याचा साक्षात्कार कसा झाला – विशाल वाकडकर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२०) :- राज्यात भाजपचे सरकार असताना डिसेंबर महिन्यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात ११ महिन्यांत तब्बल १३४ महिलांवर बलात्कार तर ३७७ महिलांचा विनयभंग घटना घडल्या होत्या. शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतरही पिंपरी-चिंचवडमध्ये महिन्याला सरासरी १२ महिलांवर बलात्कार होत असल्याचे पोलीस दप्तरी नोंद होत होती. त्यावेळी शहरातील भाजपचे आमदार पदाधिकारी रस्त्यावर का उतरले नाहीत? आता सत्ता गेल्यानंतर ५० दिवसात त्यांना गुन्हेगारी वाढल्याचा साक्षात्कार कसा झाला, असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
भाजप सरकारच्या काळात सर्वाधिक महिलावर अत्याचार व १५००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पाच वर्ष अभ्यासातून कर्जमाफी देण्यासाठी भाजपला वेळ पुरला नाही. आता राज्यात सत्ता जाताच भाजपचे पदाधिकारी कर्जमाफी व गुन्हेगारीवर आंदोलन करण्याचे नौटंकी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केेला आहे.
राज्यातील सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने बिघडलेली कायदा व सुव्यस्था तसेच शेतकर्यांची कर्जमाफी न करता फसवणूक केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी आकुर्डी येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी भाजप शहर कार्यकर्त्यांनी फ्लेक्सबाजी केली आहे. मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांना राज्यातील महाआघाडी सरकार विरोधात आंदोलन करणार असे शब्द लिहून स्वतःचे अज्ञान उघड केले आहे. शहरातील भाजपच्या आमदार व पदाधिकारी यांनी आंदोलनात अमुल्य वेळ वाया न घालवता नागरिकांसाठी राहण्यायोग्य शहर , पाण्यासाठी व खड्डे मुक्त शहर बनवण्यासाठी प्राधान्याने लक्ष घालावे असे आवाहन वाकडकर यांनी निवेदनाद्वारे केले आहे.
हिंगणघाटची घटना दुर्देवी असून राज्याचे गृहमंत्री दोनवेळा पीडितीच्या कुटूंबियांना भेटले आहेत. आरोपीला अटक करून पीडितेला न्याय देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध आहे. तेलंगणाच्या धर्तीवर राज्यात कडक कायदा करून गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण गृहमंत्रालय कामाला लागले आहे. पीडितेच्या कुटूंबियांना आवश्यक ती मदत केली जात आहे. मात्र भाजपाला या दुर्देवी घटनेवरही आंदोलन करून राजकीय पोळी बसताना सामाजिक भान त्यांनी ठेवायला हवे, असेही वाकडकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली…
भाजपाने २०१४ मध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. दीड लाखांची कर्जमाफी देण्यासाठी भाजप सरकारला ५ वर्षे लागली. महाविकास आघाडीच्या सरकारचा विस्तार होऊन केवळ ५० दिवस झाले. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी १५ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली. शेतकऱ्यांच्या हिताच्या चांगल्या होणार्या गोष्टी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मान्य नाहीत. सत्ता गेल्याने अस्वस्थ झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलनाशिवाय पर्याय नाही. राजकीय पोळी भाजण्यासाठी आंदोलनाची ‘नौटंकी’ भाजप आमदार व पदाधिकाऱ्यांनी करू नये. शहरातील आंदोलनाचा कोणताही परिणाम महाविकास आघाडीवर होणार नाही असे मत युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी व्यक्त केले आहे.















