न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत तब्बल ५० हजारांहून अधिक लोकसंख्या असणारे काळेवाडी हे गाव आहे. मात्र, गेली २० ते २५ वर्ष झाले महानगरपालिका प्रशासनाला काळेवाडी गावचा विसर पडलेला आहे.
मागील २५ वर्षांपासून काळेवाडीची वाटचाल गाव ते शहर अशी होत असताना होणाऱ्या लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने विचार करता या भागात कोणत्याही महत्वाच्या मूलभूत सुविधा किंवा उद्यान, खेळाचे मैदान, सुसज्ज रुग्णालय, नाना – नानी पार्क, सार्वजनिक स्वच्छतागृह, भाजी मंडई, वाचनालय यांसारख्या कोणत्याही सुविधा या ठिकाणी पुरविण्यात आलेल्या नाहीत.
काळेवाडीच्या आसपासच्या गावांमध्ये होणारा विकास पाहता काळेवाडी प्रचंड मागास असल्याचे दिसून येते. तसेच काही दिवसांपूर्वी काळेवाडीतील नागरिक कर भरत नसल्यामुळे विकासकामे करीत नसल्याचा हास्यास्पद खुलासा तुम्ही केला. हा आमच्यासारख्या वर्षानुवर्षे इमानदारीने कर भरणाऱ्या काळेवाडीकरांचा अपमान होता. त्यामुळे तुमच्याच शब्दांचा आधार घेऊन तुम्ही आम्हा समस्त काळेवाडीकरांना तुमच्या नवीन मिळकतकर वाढीच्या निर्णयातून वगळावे, अशी मागणी चिंचवड विधानसभेचे शिवसेना शहर संघटक हरेश बाळकृष्ण नखाते यांनी महापालिका हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.