न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ फेब्रुवारी २०२०) :- चिंचवडमध्ये चार बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिंचवड गावातील चापेकर चौकाजवळ वेताळनगर भागात रस्त्याच्या कडेला साफसफाई करणाऱ्या एका महिलेला चार लोखंडी वस्तू पडल्याचे निदर्शनात आले. बॉम् सारख्या दिसणाऱ्या या वस्तू असल्याने त्यांनी याबाबतची माहिती चिंचवड पोलिसांना दिली.
माहिती मिळताच चिंचवड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या वस्तूंची पाहणी करून पोलिसांनी हे बॉम्ब सदृश्य वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. अडगळीच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या रिक्षाच्यामागे या चार लोखंडी बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्या. आकाराने लांब गोलाकार दिसणाऱ्या या वस्तु बॉम्बसहश्य असल्याने हे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
या वस्तूंपासून नागरिकांना दूर हटविण्यात आले. चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे हे या वस्तु वाल्हेकरवाडी पोलीस चौकीत घेऊन आले. बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले. याची पाहणी केल्यानंतर हे जुने निकामी झालेले बॉम्ब असल्याचे उघड झाले. या पाहणीनंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र हे बॉम्ब या भागात कसे आले याचा पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत. शहरात अनेकदा अशा प्रकारच्या बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याचा घटना घडल्या आहेत.












