न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२०) :- येस बँकेची आर्थिक स्थिती खालावत असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खासगी क्षेत्रातील येस बँकवर गुरुवारी (दि. ५) रोजी निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे आता येस बँकेच्या खातेदारांना महिन्याला ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत.
महापालिकेच्या तब्बल ९८४ कोटी रुपयांच्या ठेवी येस बँकेत अडकल्या आहेत. त्यामुळे महापालिका आर्थिक अडचणीत आली आहे. त्यामुळे पिंपरी महापालिकेला देखील पैसे काढता येणार नाहीत. त्याचा महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची भिती आहे.
महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे म्हणाले, ‘पिंपरी महापालिकेच्या येस बँकेत ९८४ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. महापालिकेने २०१७ पासून खासगी येस बँकेत ठेवी ठेवण्यास सुरुवात केली. त्यावर ८.१५ टक्क्यांनी व्याज मिळत होते. महापालिकेकडे बाकीचे पैसे आहेत. त्यामुळे त्वरित एवढी अडचण येणार नाही. ३० दिवसांपर्यंतच निर्बंध आहेत. त्यानंतर नियमित कामकाज झाल्यावर पैसे काढता येतील. पैसे बुडणार नाहीत. तात्पुरते निर्बंध आहेत. बँक ऑफ बडोदामध्ये देखील पैसे ठेवले आहेत. त्यामुळे वेतनावर, कामावर परिणाम होणार नाही’.













