- राज्याच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीचं अभिनंदन – विजय गुप्ता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२०) :- शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे सरकार मोठ्या आर्थिक आव्हानांना सामोरे जात, राज्याचा गाडा यशस्वीपणे हाकीत आहे. देशात आर्थिक मंदीचे वातावरण असतांना देखील आज सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात ग्रामीण भाग आणि शेतीच्या विकासासाठी तसेच रोजगार वाढण्यासाठी राज्य शासनाने ठोस पाऊले उचलली आहेत. २०२०-२१ च्या राज्याच्या या अर्थसंकल्पात हे ठळक मुद्दे प्रतिबिंबीत केलेले आहेत. हा केवळ अर्थसंकल्प नाही तर, जनकल्याणाचा संकल्प आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद लाभलेल्या या सरकारने सामाजिक भावनेतून आखलेल्या अनेक नव्या योजनांमुळेच राज्याच्या विकासाची गती आणखी वाढेल. त्यामुळेच ‘आज शिवसेनेने वरून नाही तर, करून दाखविले आहे’, असा विश्वास प्रसिद्धीपत्रकाद्वारे शिवसेना पिंपरी विधानसभेचे समन्वयक विजय गुप्ता यांनी व्यक्त केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात विजय गुप्ता यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने आज पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. आज विधीमंडळात सादर झालेला अर्थसंकल्प महाराष्ट्रातील प्रत्येक समाजासाठी, प्रत्येक घटकासाठी, प्रशासनाच्या सर्व क्षेत्रांसाठीचा अर्थसंकल्प आहे. व्यवहारिक आणि महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या अर्थसंकल्पाबद्दल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन करतो. तीन वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांचे आमचे सरकार असले तरी, तिन्ही पक्षांनी एका विचाराने हा अर्थसंकल्प मांडला आहे. पैशांचे सोंग न करता राज्याला प्रगतीकडे नेण्याचा संकल्पच शिवसेना व महाविकास आघाडी सरकारने या अर्थसंकल्पातून केला आहे.
महाराष्ट्रात शेती, शिक्षण, पाणी, उद्योग अशा सर्वच बाबतीत महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी यात ठोस पावले उचलण्यात आली आहेत. त्यामुळेच एका विचाराने तयार झालेल्या अर्थसंकल्पाने विरोधी पक्षाची चिंता मिटलेली असेल, असे म्हणायला हरकत नाही. या अर्थसंकल्पात शेती आणि शेतकरी, शिवभोजन थाळींच्या संख्येत वाढ, मुद्रांक शुल्कात सवलत. राज्यातल्या ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांसाठी, उच्च तंत्रशिक्षणासाठी १३०० कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात महिला आयोग, प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्थानकांची उभारणी होणार आहे. तसंच प्रत्येक जिल्ह्यात महिला आयोगाचं कार्यालय व महिला आणि बालकल्याणासाठी २,११० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.
वर्षानुवर्षे खितपत पडलेले प्रश्न सोडवण्याची ताकद आता केवळ शिवसेनेच्या नेतृत्वाखालील राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आहे. इतक्या वर्षांत जे घडले नाही, ते उद्धवसाहेबांनी करून दाखवले. यंदाच्या अर्थसंकल्पाद्वारे उद्धवसाहेबांनी विकासासाठी फक्त विकासाची कामे हाती घेतली. या कामांमुळेच उद्या लोकांचे पाठबळ शिवसेनेच्या पाठीशी उभे राहणार आहे. याउलट भाजपचे हात हिंदुत्त्वाची पताका सावरण्यात गुंतले आहेत. मात्र, इकडे शिवसेना २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करीतच राहणार आहे. आमच्यासारखा खरा शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी ठाम उभा आहे. त्यामुळेच ‘आमची शिवसेना वरून नाही तर, करून दाखविते’, असा टोलाही गुप्ता यांनी या पत्रकाद्वारे विरोधकांना लगावला आहे.













