न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२०) :- पिंपरी येथील नव महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा दि. १८ ते २२ मार्च या कालावधीत होणार आहे. स्पर्धेत ४८८ खेळाडूंनी सहभाग नोंदविल्याची माहिती क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, माजी महापौर मंगला कदम, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेची माहिती देताना तटकरे म्हणाल्या, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ही पहिलीच स्पर्धा होत आहे. पहिल्याच स्पर्धेच्या संयोजनाचा मान पिंपरी – चिंचवड शहराला मिळाला आहे. क्रीडा व युवक संचलनालयाच्या नियंत्रणाखाली ही स्पर्धा होणार असून कोणाचाही स्थानिक पातळीवर यामध्ये हस्तक्षेप होणार नाही. २३ तारखेला या स्पर्धेचा अंतिम सामना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. ९० हजार रुपयांची बक्षिसे विजेत्या खेळाडूंना दिली जाणार असून पंचांसह खेळाडूंचा जाण्या – येण्याचा व राहण्याचा, भोजनाचा खर्च केला जाणार आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात महापौर या संबंधित समितीच्या सदस्या असताना त्यांचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही. त्यामुळे ही स्पर्धा राज्य शासनाची की स्थानिक राष्ट्रवादीची असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नुकत्याच राबविण्यात आलेल्या महापौर चषक व टीन – २०२० स्पर्धांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तक्रारी केल्याचे निदर्शनास आले आहे. या तक्रारींची दखल घेऊन माहिती व अहवाल मागितला जाईल, तसेच तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास कारवाई केली जाईल. – क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे












