न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२०) :- अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत वाढता सहभाग हा पोलिसांची डोकेदुखी ठरली आहे. या मुलांचे वेळीच समुपदेशन केल्यास त्यांना गुन्हेगारीपासून रोखता येऊ शकते. यामुळेच झोपडपट्टीत शाळा भरवून मुलांचे समुपदेशानाचे वर्ग घेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
वाहन चोरीमध्ये लहान मुलांचा वाढता सहभाग असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. ही लहान मुले पोलिसांच्या रेकॉर्डवर नसल्याने त्यांना शोधताना पोलिसांच्या नाकी नऊ येत आहे. त्यातच ते अल्पवयीन असल्याने पोलिसांना त्यांना मारताही येत नाही. या मुलांना बालसुधारगृहात ठेवणे एवढेच पोलिसांच्या हाती उरले आहे. यामुळे ही मुले बालसुधारगृहातून आल्यावर पुन्हा गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात. एवढेच नव्हे तर लुटमार, वाहनांची तोडफोड, घरफोडी आणि हाणामारीमध्येही अल्पवयीन मुलांना वाढता सहभाग असल्याचे दिसून आले आहे.
माजी पोलीस आयुक्त आर. के.पज्ञनाभन यांनी गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलांची यादी तयार करण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना दिले होते. त्यानुसार पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तांच्या हद्दीत तब्बल एक हजार १६ जणांची भली मोठी यादी तयार झाली आहे. यापैकी ७०८ अल्पवयीन मुले २०१९ मध्ये सज्ञान झाली आहेत. मात्र वाईट संगतीमुळे ही मुले पुन्हा गुन्हेगारी क्षेत्राकडे वळण्याची शक्यता आहे. यापैकी ९० टक्के गुन्ह्यातील अल्पवयीन मुले ही झोपडपट्टी भागातील असल्याचे दिसून आले आहे. एकट्या पिंपरी चिंचवड शहराचा विचार केला तर शहरात तब्बल ७२ घोषित झोपडपट्ट्या आहेत.
शहरातील युवा पिढी भरकटू लागली आहे. युवा वर्ग चांगल्या मार्गाने पुढे गेल्यास सुदृढ समाजाची निर्मिती होईल. त्यासाठी आता गुन्हेगारीकडे वळू पाहणाऱ्या अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच, गुन्हेगारांची उगमस्थाने असलेल्या ठिकाणी रोजगार मेळावे भरवून तरुणांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
– रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त












