न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२०) :- पुण्यात कोरोनाचे दोन रूग्ण आढळले असून या पती-पत्नीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निदान झाल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित रूग्णांना नायडू रूग्णालयातील कोरोना कक्षात दाखल करण्यात आले असून त्यांनी २० फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारीदरम्यान दुबईचा दौरा केला होता.
भारतात परतल्यानंतर त्याच्या सर्दी, खोकला आणि ताप ही लक्षणं दिसून आली. या दाम्पत्याचे घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीला तपासणीसाठी पाठविण्यात आल्यावर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना स्वतंत्र वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. हे रुग्ण पुण्यातील रहिवासी असून ४९ आणि ५१ वयाचे आहेत. त्यामुळे ते सोमवारी नायडू रूग्णालायात दाखल झाले. त्यानंतर केलेल्या तपासादरम्यान त्यांच्यापैकी एकाला करोनाची सौम्य लागण झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू करण्यात आले असून दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली. तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यासही सुरूवात करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कोरोनाचे दोन संशयित रुग्ण पुण्यात आढळले आहेत. तसंच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. नागरिकांनी घबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. तसंच कोणत्याही ठिकाणी वावरताना वैयक्तिक स्वच्छता पाळावी. तंसंच खोकताना, शिंकताना मास्क ऐवजी, रूमाल वापरावा असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे.












