न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली येथे स्कॉर्पिओ कारमधून हजारोंचा बेकायदेशीर गुटखा जप्त करण्यात आला आहे ही कारवाई दरोडा विरोधी पथक आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे. तसेच गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली.
सदर कारवाई सोमवारी (दि. ९) चिखली येथे करण्यात आली. गणेश नंदाराम चौधरी ( वय ३५ ), राजु गणाराम चौधरी ( वय २५, दोघे रा. कुदळवाडी, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक चिखली परिसरात गस्त घालत होते. गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकातील पोलीस नाईक नितीन लोखंडे यांना माहिती मिळाली की, ज्ञानदीप बंगल्यासमोर सार्वजनीक ठिकाणी स्कॉर्पिओ कार ( एम एच १४ जे एल २२६६ ) उभी आहे. त्यामध्ये गुटखा असून दोघेजण तो गुटखा विक्रीसाठी घेऊन जात आहेत. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारमधून गुटखा आणि साडेपाच लाखांची स्कॉर्पिओ कार असा एकूण पाच लाख ७६ हजारांचा ऐवज जप्त केला. दोन जणांना अटक केली असून त्यांना पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे औंधचे सहाय्यक आयुक्त ( अन्न ) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.












