न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२०) :- देहूत ३७२ व्या तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त शासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. संत तुकाराम महाराज संस्थानकडूनही भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. बीज सोहळा मुख्यत्वे गोपाळपुरा भागातील वैकुंठस्थान मंदिरात पार पडत असला तरी भाविक प्रथम मुख्य मंदिरात विठुरायाचे दर्शन घेतात. त्यानंतर या सोहळ्यासाठी वैकुंठस्थान मंदिराकडे जातात. त्यामुळे मुख्य मंदिरात भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी संस्थानकडून तातडीची कामे सरू आहेत.
मुख्य मंदिराच्या देऊळवाड्यात असलेल्या गुळगुळीत फरशीवरून भाविक घसरून पडण्याचा धोका विचारात घेऊन संस्थानने फरशी हटवली आहे. बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. वीज सोहळ्यानंतर पुरातत्व विभागाचे निर्देशानुसार संस्थानकडून दगडी फरशी बसविण्यात येणार आहे. मुख्य मंदिराला जाण्यासाठीच्या दर्शनबारीचा शेवटचा टप्पा देऊळवाड्याच्या छतावरून जात असल्याने भाविकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. यावर्षी संस्थानकडून या ठिकाणी छत टाकण्यात येणार आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे.
बीज सोहळ्यासाठी तुकारामगाथेच्या पाच हजार प्रती, तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेच्या पाच हजार प्रती छापण्यात आल्या असून दोन दिवसांत त्या वितरणासाठी उपलब्ध होतील. वैकुंठस्थान मंदिरासमोर नांदुरकी वृक्षाशेजारी समारे २० फूट रुंद आणि ४० फूट लांबीचा तात्पुरता कीर्तनमंडप उभारण्यात येत आहे. मंदिरासमोर पालखी ठेवण्यात येते. त्यामुळे या ठिकाणीही मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. सोहळ्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या काही दिंड्यांकडून नदीघाटावर यावर्षीही मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. भाविकांच्या निवासासाठी गावातील १६ धर्मशाळा, जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वर्गखोल्या आणि वैकुंठस्थान मंदिराच्या आवारातील भक्तनिवास सज्ज आहे. काही मंगल कार्यालयांतही दिंड्यांची मुक्कामाची व्यवस्था केली जाते. मंदिराजवळच्या घाटावर भाविकांसाठी सुरक्षेचा इशारा देणारे फलक लावण्यात येणार आहेत. नदीचे पात्र अतिशय खोल असल्यामुळे या ठिकाणी अधिक खबरदारी घेतली जाते. तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या वह्या याच ठिकाणी बुडवण्यात आल्या चौदा दिवसांनी त्या पाण्यावर तरंगत वर आल्या. अशी आख्यायिका असल्याने भाविक घाटावर गर्दी करतात. सोहळ्यासाठी इंद्रायणीत आंद्रा धरणातुन पाणी काम सोडण्यात आले आहे. पुढील दोन दिवसांत पाणी देहत पोहोचेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता एन. बी. गदादे यांनी दिली. यंदा पाऊस चांगला झाल्याने नदीत भरपूर पाणी आहे. त्यामुळे वडिवळेच्या धरणातून सोडण्यात येणारे पाणी थांबविण्यात आले आहे.


















