- प्राधिकरणाने राडारोडा टाकून पुलावर जाणारा रस्ता केला बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते व काही नगरसदस्यांच्या उपस्थितीत औंध-पुणे रस्त्यावरील जगताप डेअरी चौकातील पुलाचे सोमवारी उदघाटन केले होते. मात्र, पुलाचे काम अर्धवट असल्याचे सांगत आज ‘पीसीएनटीडीने’ ढिगारा टाकून हा पुल बंद केला आहे.
महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी या उद्घाटनास विरोध दर्शविला होता. पुलाचे काम अद्याप बाकी आहे. राडारोडा तसेच खड्डे बुजविलेले नाहीत. पुलावरील वायरींग उघड्यावरच आहे. अशा परीस्थितीमध्ये घाईघाईने उद्धघाटन करुन पुल वाहतुकीस खुला करण्यात आलेला आहे. यामध्ये एखादा दुचाकीस्वाराचा अपघात होऊन जिवितहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण? केवळ श्रेय घेण्यासाठी हा सर्व घाट घालण्यात आलेला आहे.
केवळ राजकीय द्वेषापोटी महापौरांनी कोणताही राजशिष्टाचार न पाळता पालिकेच्या कोणत्याही गटनेत्यांना तसेच प्राधिकरणाच्या संबंधित अधिका-यांना कल्पना न देता घाईघाईने पुलाचे उद्घाटन उरकले, असा आरोप काटे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला होता. प्राधिकरणाने मात्र, हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे आता हा पूल वाहतुकीसाठी केव्हा खुला होणार, याची प्रतीक्षा शहरातील नागरिक करीत आहेत.















