न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मार्च २०२०) :- येस बँक या खासगी बँकेत पिंपरी – चिंचवड महापालिकेचे तब्बल ९८४ कोटी रूपये अडकून पडले आहेत. त्यामुळे महापालिकेने इतर ४ खासगी बँकेत ठेवलेले तब्बल १०० कोटी रूपये काढून घेत तेथील सर्व खाती बंद केली आहेत. मिळकतकर, पाणीपट्टी, एलबीटी, बांधकाम परवाना, आकाशचिन्ह परवाना तसेच, विविध कर आणि शुल्काचा भरणा महापालिकेतर्फे येस बँकेत केला जात होता. ही बँक डबघाईस आल्याने त्यावर भारतीय रिजर्व्ह बँकेने ( आरबीआय ) निर्बंध लादले आहेत. त्यामुळे पालिकेचे तब्बल ९८४ कोटी रूपये बँकेत अडकून पडले आहे.
इंडसइंड बैंक, साऊथ इंडियन बैंक, कोटक महिंद्रा बैंक आणि आयटीआय बैंक या चार बँकेत पालिकेले बचत खाते होते. या बँकेतील खाते तत्काळ बंद करण्याबाबत आयुक्तांनी सोमवारी (दि. ९) त्या बँकांना पत्र दिले होते. ही बँक खाती ६ महिने ते २ वर्षांपासून सुरू करण्यात आली होती. त्यानुसार त्या चार बँक खात्यातील मिळून तब्बल १०० कोटींची रकम बँक ऑफ बडोदाच्या पालिकेच्या खात्यात बुधवारी (दि. ११) जमा करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.















