न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मार्च २०२०) :- स्थायी समितीचे मागील अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी घेतलेले विविध निर्णय नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष लोंढे यांनी आपल्या पहिल्या सभेतच फिरविले आहेत. त्यामुळे भाजपमधील गटातटाचे राजकारण उघडे पडले आहे. समितीचे अध्यक्ष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सभा बुधवारी (दि. ११) झाली.
सभेत ऐनवेळी पंडित दिनदयाल उपाध्याय महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रम योजनेसाठी भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेला स्थायी समितीने मंजुरी दिली होती. त्याऐवजी चॅम्प एज्युटेक प्रा. लि. या संस्थेला देण्यास स्थायी समितीने १७ फेब्रुवारीला मंजुरी दिली होती. तो निर्णय रद्द करीत समितीने ही योजना भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडून राबविण्यास आयत्यावेळी मंजुरी दिली आहे. महिला व बालकल्याण समितीने ठराव केल्याने तसा बदल केल्याची माहिती अध्यक्ष लोंढे यांनी दिली. त्या अंतर्गत एकूण ६९ विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण महिलांना देण्यात येणार आहे.
रस्ते व आरक्षणाने बाधित क्षेत्र खासगी वाटाघाटीने ताब्यात घेण्यात येणार होते. त्यासाठी वाकड, रहाटणी, सांगवी, चिखली, मोशी, पिंपळे सौदागर, दापोडी येथील संबंधित जागामालकांना एकूण १६ कोटी ८० लाख ७३ हजार ६७६ इतका मोबदला देण्यास स्थायी समितीने २८ फेब्रुवारीला मंजूरी दिली होती. तो विषय समितीने आयत्यावेळी मागे घेतला. तसेच, शालेय गणवेश खरेदीस ऐनवेळी मंजुरी देण्यात आली.
शहरातील भारतीय लष्करातील शहीदच्या कुटुंबास ५ लाख रूपयांचे अर्थसहाय या पुढे देण्यात येणार आहे. त्यास समितीने आयत्यावेळी मंजुरी दिली. सभेत एकूण ३७ लाख रूपये खर्चाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. थिएटर वर्कशॉप कंपनी संस्था व पैस रंगमंचतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मुख्य प्रायोजक म्हणून ८० हजार रूपये देण्यास समितीने मंजुरी दिली. वाकड येथील मुळा नदी ते ताथवडे हद्दीपर्यंत मुंबई बेंगलोर महामार्गाच्या दोन्ही बाजूस १२ मीटर सर्व्हिस रस्ता करण्यात येणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गासाठी हा रस्ता बनविणे आवश्यक आहे. या भूसंपादनासाठी येणाऱ्या खर्चास समितीने ऐनवेळी मंजुरी दिली.















