- खेळासाठी व उद्यानासाठी भूखंडाचा ताबा घेता येत नाही; ही समाविष्ट गावाची मोठी शोकांतिका
- राष्ट्रवादी नगरसेविका विनया तापकीर यांनी व्यक्त केली खंत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेत चऱ्होली हा भाग वीस वर्षांपूर्वी समाविष्ट झाला. मात्र, बेस्ट सिटी जाऊन आता स्मार्ट सिटी आली तरीही, या भागाचा विकास झालेला नाही. परिणामी नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा भाग नक्कीच पिंपरी-चिंचवड महापालिकेत आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. महापालिका शहरातील इतर भागाप्रमाणेच या भागातही कर आकारणी करते. मग इतर भागाप्रमाणेच या परिसराचा विकास कधी करणार? मुलांना खेळण्यासाठी मैदान व नागरिकांना सुविधायुक्त उद्यान कधी होणार? असा सवाल राष्ट्रवादीच्या नगरसेविका विनयाताई तापकीर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, चऱ्होली हा परिसर आता कात टाकत आहे. या भागातही उंचच उंच टोलेजंग इमारती आकारास येत आहेत. त्यामुळे गावाचे शहर कधी झाले ते समजलेच नाही. इमारतीत नागरिक वास्तव्यास आले आहेत. प्रसंगी शहरीकरण जोर धरू लागले आहे. या वाढत्या नागरीकरणाच्या अपेक्षाही वाढत आहे. त्यामुळे या परिसरात मुलांना खेळण्यासाठी मैदान, तसेच जेष्ठ नागरिक, लहान मुले व महिलांसाठी सुविधायुक्त उद्यानाची मागणी जोर धरू लागली आहे. परिसरात खेळाचे मैदान नसल्याने मुलांनी खेळायचे कुठे, असा सवाल पालक विचारित आहेत. प्रसंगी परिसरातील नागरिक मुलांच्या खेळासाठी मुलांना पुण्याकडे नेत आहेत तर, उद्यानासाठी भोसरीकडे पायपीट करीत जात आहेत, असेही तापकीर यांनी म्हटले आहे.
गेल्या २० वर्षांत महापालिका प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने आज ही वेळ नागरिकांवर आलेली आहे. परिसरात उद्यानासाठी सर्व्हे नंबर १८७ या ठिकाणी भूखंड आरक्षित असतानाही या भूखंडाचा ताबा अद्यापपर्यंत महापालिका प्रशासनास घेता आलेला नाही. तसेच खेळाच्या मैदानासाठी आझादनगर येथील सर्व्हे नंबर १५७ मधील क्षेत्र आरक्षित असतानाही ते क्षेत्र महापालिकेने ताब्यात घेतलेले नाही. विकास आराखड्यानुसार आरक्षित भूखंड ताब्यात घेऊन विकसित करण्याकडे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे खेळाचे मैदान, उद्यान व आदी प्राथमिक सुविधादेखील नागरिकांना उपलब्ध झालेल्या नाहीत. प्रशासन समाविष्ट गावांच्या विकासाबाबत ठोस निर्णय घेत नाही. त्यामुळे विकास ठप्प झाला आहे, असेही तापकीर यांनी म्हटले आहे.
पर्यायाने लहान मुलांना खेळण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने मुले घराबाहेर पडत नाही. मोबाइलच्या विश्वातून मुलांना बाहेर काढण्यासाठी त्यांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. एकीकडे शहरात अनेक उद्याने विकसित केली जात आहेत. उद्यानांमध्ये ज्येष्ठांसाठी ‘वॉकिंग ट्रॅक’ तयार केले जाते. लिनिअर अर्बन गार्डन तयार केले जाते. मात्र, दुसरीकडे लहान मुलांना खेळाण्यासाठी, वृद्धाना, महिलांना विरंगुळा म्हणून उद्यानासाठी जागा उपलब्ध असतानाही ती ताब्यात घेता येत नाही, ही समाविष्ट गावाची शोकांतिका म्हणावी लागेल. महापालिकने आरक्षित भूखंड ताब्यात घ्यावीत. मुलांना खेळण्यासाठी मैदान व उद्यान विकसित करण्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा परिसरातील नागरिकांची मोट बांधून मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा नगरसेविका तापकीर यांनी या पत्रकात दिलेला आहे.















