न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मार्च. २०२०) :- करोना व्हायरसची माहिती ऑनलाईन शोधणाऱ्या अनेकाना सायबर चोरट्यांनी दणका दिला आहे. संगणकातील गोपनीय माहिती व पासवर्ड चोरीला जात आहे. यामुळे करोना व्हायरसचा मॅप उघडू नका, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर शाखेने केले आहे.
करोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातही करोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या धक्क्यातून नागरिक सावरलेले नाही. जगात कोठे कोठे करोना व्हायरसचे रुग्ण अधिक आहेत, याची माहिती अनेकजण संगणकावरून घेत असल्याचे दिसून आले आहे.
याचाच फायदा सायबर चोरट्यांनी घेतला आहे. त्यांनी करोना व्हायरसचा नकाशा ऑनलाइन टाकला आहे. हा नकाशा उघडताच संगणकातील माहिती सायबर चोरटे घेतात. त्यात आपला पासवर्डही चोरला जातो यामुळे हा नकाशा कोणीही उघडू नका किंवा डाउनलोडही करू नका, असे आवाहन पिंपरी चिचवड पोलिसांच्या सायबर शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी केले आहे.















