- आज मध्यरात्रीपासून अंमलबजावणी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२०) :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील व्यायामशाळा, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, जलतरण तलाव बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. ही अंमलबजावणी शुक्रवारी (दि. १३) रात्री बारा पासून पुढील १५ दिवसांसाठी असणार आहे. करोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी लोकांनी अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळली पाहिजे असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलं.
पुणे आणि पिंपरीमधील शाळा पुढील आदेशापर्यंत १५ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येत असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. आज मध्यरात्रीपासून सर्व निर्णय लागू केले जाणार आहेत. परीक्षा उशिरा घेण्यासंबंधी विचार केला जात आहे असं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
“मॉल्स, रेस्तराँ, हॉटेल आपण बंद करत नाही आहोत पण तिथे जाणं लोकांना टाळावं,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. “सुदैवाने अजून १७ ही लोकांमध्ये गंभीर लक्षणं दिसत नाही आहेत. आपण दक्षता घेतली तर पुढील धोका टाळू शकतो,” असं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
“सुदैवाने आपल्या येथून उत्पत्ती झालेली नाही. त्यामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा वगळता पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.