- चौकशीच्या धमक्यांना आपण घाबरत नाही; एकदा चौकशी करूनच टाका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार होत असल्याची आवई सातत्याने उठविली जात आहे. विरोधकांकडून भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी होत असून, सातत्याने धमकी दिली जात आहे. रोज हा प्रकार करण्याऐवजी एकदा चौकशी करूनच टाका, चौकशीच्या धमक्यांना आपण घाबरत नाही, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता जाहीर आव्हान दिले.
पदाधिका-यांशी संवाद साधण्याच्या निमित्ताने शहरात आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी वरील आव्हान दिले. महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात दोनशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नुकताच राष्ट्रवादीने केला होता. याशिवाय यांत्रिकीकरणाद्वारे रस्ते सफाई, येस बँकेत अडकलेली रक्कम व इतर काही मुद्यांवर आक्षेप घेत राष्ट्रवादीने महापालिकेतील कारभाराची चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
या विषयावर बोलताना ते म्हणाले, महापालिकेचा कारभार हा नियमानुसार चालू आहे. मात्र, सातत्याने चौकशीची धमकी दिली जात आहे. राज्य शासनाचा कारभार त्यांच्या हाती असल्यामुळे त्यांनी चौकशी करावी. सातत्याने धमकी देण्याऐवजी एकदाची चौकशी करूनच टाका, चौकशीच्या धमक्यांना आपण घाबरत नसल्याचे पाटील म्हणाले. पाटील यांनी दिलेल्या आव्हानानंतर उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री काय निर्णय घेतात आणि स्थानिक राष्ट्रवादीचे नेते काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.













