न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२०) :- शहरातील तब्बल ७० जण विवाह समारंभासाठी नुकतेच थायलंडला जाऊन आले. त्यातील काही जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या ७० जणांची आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक, नागरिकांचा शोध घेण्याची मोहिम पिंपरी – चिंचवड महापालिकेने तीव्र केली आहे.
या मोहिमेमुळे पालिका प्रशासनाला अक्षरक्ष : घाम फुटला आहे. शहरातील तब्बल ९३ जण थायलंडमध्ये एका विवाह समारंभास जाऊन आले आहेत. त्यातील काही जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यातील २३ जण पुण्यातील आणि ७० जण पिंपरी चिंचवड शहरातील आहे. व-हाडी मंडळीत राजकीय नेते, पदाधिकारी, छायाचित्रकार, व्यापारी व व्यावसायिक मंडळीचा समावेश आहे. त्या सर्व नागरिकांचा तसेच, त्यांच्या संपर्कात आलेले त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी, नागरिक आदींचा शोध घेतला जात आहे.
ही बहुतांश मंडळी भोसरी, पिंपळे सौदागर, वाकड आदी परिसरातील आहे. संबंधितांशी पालिकेकडून वारंवार संपर्क केला जात आहे. मात्र, त्यांतील अनेकांनी आपले मोबाईल क्रमांक बंद केले असून काही शहराबाहेर गेले आहेत. त्यामुळे त्याच्याशी संपर्क होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. त्याचा पालिकेतर्फे कसून शोध घेण्यात येत आहे. त्यातील निम्म्या लोकांचा शोध घेण्यास पालिका प्रशासनाला आतापर्यंत यश आले आहे. उर्वरित लोकांशी संपर्क साधण्यासाठी प्रशासनाकडून धावपळ सुरू आहे. राज्य शासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याबाबत सातत्याने विचारणा केली जात आहे. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांना घाम फुटला आहे. परदेशातून आलेले व त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण १६९ जणांचा आतापर्यंत शोध घेण्यात आला आहे. त्यांची तपासणी करून त्या दृष्टीने वैद्यकीय उपचार केले जात आहेत, असे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.















