न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२०) :- देशभरात करोना व्हायरसने थैमान घातला असताना महाराष्ट्रात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोनाग्रस्त रुग्णाचं निधन झालं आहे. यामुळे भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे.
संबंधित ६४ वर्षीय व्यकी घाटकोपरला वास्तव्यास होती. दुबईतून परतल्यानंतर त्यांना करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. यामुळे त्यांना कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. मंगळवारी सकाळी त्यांचं निधन झालं.
भारतात करोनामुळे आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या मृत्यूची नोंद कर्नाटकात झाली होती. कर्नाटकमध्ये ७९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राजधानी दिल्लीत दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यात दिल्लीमधील राम मनोहर लोहिया रुग्णालयात ६८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे.















