- बांधकाम कामगारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी संघटनेचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात करोना या विषाणूने थैमान मांडलेले आहे. दिवसेंदिवस शहरातील रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. शहरातील बांधकाम कामगारांमध्येही जनजागृती होणे आवश्यक आहे. मात्र, या बाबतीत प्रशासनाच्या हालचाली कमी पडत आहेत. आजपर्यंत कुठल्याही बांधकाम प्रकल्पावर, कामगार वस्तीवर अथवा कामगार नाक्यावर कोणत्याही शासकीय अधिका-यांनी भेटी दिलेल्या नाहीत. त्यामुळे या विषाणूला अटकाव करण्यासाठी बांधकाम कामगार संघटनेने कंबर कसली असून, शहरातील बांधकाम प्रकल्पांवर प्रत्यक्ष भेटी देऊन कामगारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. या बाबतीत बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्ष जयंत शिंदे यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, राज्यातून व परप्रांतातून शहरातील विविध बांधकाम प्रकल्पांवर लाखो बांधकाम कामगार मेहनत मजदूरी करून, आपले व आपल्या कुटुंबच पोट भरीत आहेत. काम मिळेल त्या ठिकाणी हे कामगार वस्ती करून राहतात. या वस्तीच्या आजुबाजूला असलेले घाणीचे सामाज्य, स्वच्छतागृहांची दुरावस्था आणि स्वत:च्याच आरोग्याबाबत असलेली उदासिनता, ही त्या कामगाराला मृत्युच्या दाढेपर्यत कधी घेवून जाते, हे त्याला स्वत : ला देखील कळत नाही, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
आज शहरात “ करोना ” या आजाराने उचल खाल्ली आहे. मात्र, शासनाचे या कामगारांच्या आरोग्याकडे लक्ष नाही. शहरातील एकही बांधकाम कामगार या आजाराने बळी पडणार नाही, यासाठी बांधकाम कामगार संघटनेने पुढाकार घेतला असून, संघटना सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. प्रभावीपणे कामगारांमध्ये जनजागृती करीत आहे. त्यास कामगारांचा सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
संघटनेच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यासोबत नुकतीच मोशीतील बांधकाम प्रकल्प, कामगार वस्ती व कामगार नाक्यावर जाऊन कामगारांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांना करोना आजाराविषयी व त्यावरील उपचार आणि या आजाराला प्रतिबंध कसा घालता येईल? याबाबत माहिती दिली. बांधकाम व्यावसायिकांनीही नवीन परप्रांतिय कामगार प्रकल्पांवर कामास घेऊ नयेत, कामगार गावाला अथवा दुस-या शहरात जात असेल तर, त्यालासुद्धा काही दिवस प्रवास टाळायला सांगा, असे आवाहनही शिंदे यांनी या पत्रकात केले आहे.















