न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२०) :- रावण टोळीच्या म्होरक्याचा भाऊ असलेल्या सराईत गुन्हेगाराचा गॅरेजमधील साहित्याने निर्घृणपणे मारून भरदिवसा खून केला. ही घटना मंगळवारी (दि. १७) दुपारी साडे पाचच्या सुमारास आकुर्डी पोस्ट ऑफिससमोर घडली.
खून करणाऱ्या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मयत सोन्या हा सराईत गुन्हेगार होता. सोन्या हा रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याचा भाऊ होता. त्याच्यावर दरोड्याच्या प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल होते.
आशिष विशाल जगताप (वय २३), विकास गोरख तांदळे (वय २१), प्रसाद अशोक आल्हाट (वय २५), सागर रमेश धनवटे (वय १८, सर्व रा. आकुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अविनाश उर्फ सोन्या राजेंद्र जाधव (वय २६, रा. जाधव वस्ती, रावेत) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र दत्तात्रय जाधव (वय ५५, रा. रावेत जाधवनगर) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.















