न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२०) :- देशातील कोरोना संसर्गग्रस्तांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. भारतात अजून कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झालेला नाही. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या ( आयसीएमआर ) महासंचालकांनी ही माहिती दिली.
कोरोना विषाणूचा समूह संसर्ग सुरू झाला आहे का, हे तपासण्यासाठी आयसीएमआरकडून एकूण ५० शहरांमधील ८२० नागरिकांचे नमुने घेण्यात आले होते. समाधानकारक बाब म्हणजे या सर्व नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत. आयसीएमआर आता नमुन्यांची तसेच शहरांची संख्या वाढवून पुन्हा पाहणी करणार आहे.
ज्या भागात कोरोना संसर्गग्रस्त आढळले आहेत त्या परिसरात आणखी नमुने एकत्रित करण्यात येणार आहे. परंतु तूर्त देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झालेला नसल्याचे अभ्यासातून समोर आले आहे, असा निष्कर्ष आयसीएमआरने काढला आहे. सध्या देशात जे कोरोना संसर्गग्रस्त आहेत, ते परदेशातून आलेले आहेत. या रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र, परदेशात न गेलेल्या किंवा परदेशात गेलेल्यांच्या संपर्कात न आलेल्या व्यक्तीला कोरोना संसर्ग झाल्याचे अद्याप आढळले नाही. याच प्रक्रियेला समूह संसर्ग ( कम्युनिटी आऊटब्रेक ) म्हणतात. समूह संसर्ग सुरू न होणे देशासाठी समाधानकारक बाव आहे. मात्र, असे असली तरी सर्वांना काळजी तसेच दक्षता घेण्याचा सल्ला दिला जात आहे.













