न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२०) :- आर्थिक निर्बंधांमुळे खासगी क्षेत्रातील ‘येस’ बँकेत अडकलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ९८४ कोटी २६ लाख रुपये अखेर परत मिळाले आहेत.
गुरुवारी (दि. १९) रात्री उशिरा महापालिकेला पैसे मिळाले असून पिंपरीतील बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पैसे जमा केले आहेत. १५ दिवसांनी महापालिकेला पैसे मिळाले आहेत. त्यामुळे महापालिकेला आर्थिक दिलासा मिळाला आहे.
याबाबत बोलताना महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे म्हणाले, ‘पिंपरी महापालिकेचे ‘येस’ बँकेत अडकलेले ९८४ कोटी २६ लाख रुपये परत मिळाले आहेत. गुरुवारी (दि.१९) रात्री पैसे मिळाले. राष्ट्रीयकृत असलेल्या पिंपरी शाखेतील बँक ऑफ बडोदामध्ये पैसे जमा केले आहेत. महापालिकेचे सर्व व्यवहार बँक ऑफ बडोदामधून होत आहे. दैनंदिन भरणा याच बँकेत केला जात आहे. तर, यापुढे राष्ट्रीयकृत बँकामध्ये पैसे ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.















