- नागरिकांपुढे पेच; नियमित पाणीपुरवठ्याची होतेय मागणी….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात करोना या विषाणूने थैमान घातले आहे. शहरात करोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या १२ एवढी झालेली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिका प्रशासन शहरातील नागरिकांना घरातून बाहेर पाडू नका, ३१ मार्चपर्यंत घरातच रहा, स्वच्छता पाळा, वेळोवेळी हात धुवा असे आवाहन करीत आहे. शहरातील शाळा, महाविद्यालय, उद्यान, प्रेक्षागृह, क्रीडांगण, जलतरण तलाव, चित्रपटगृह, शॉपिंग मॉल बंद आहेत. जवळपास शहरातील सर्व उपनगरं बंद आहेत. त्यामुळे कामावर जाणारे नागरिक, शाळेत जाणारी मुलं त्यांच्यासह सर्व कुटुंब कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून घरीच वास्तव्यास आहे.
स्वच्छतेचे पालन करणेही नागरिकांकडून सुरूच आहे. उन्हाळ्यामुळेही पाण्याचा वापर वाढलेला आहे. म्हणून पाण्याची अधिक आवश्यकता भासत आहे. मात्र, महापालिकेने शहरात आधीचाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केलेला आहे. त्यामुळे पर्यायी पाण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने आपली हेकेखोर भूमिका बदलून, शहरवासीयांवर लटकलेले करोनाचे भूत पळविण्यासाठी व स्वच्छतेचा मंत्र जपण्यासाठी दिवसाआड पाणीपुरवठा बंद करावा, अथवा पुरेशा दाबाने तरी पाणी सोडावे. त्यामुळे निश्चितच नागरिकांना स्वच्छतेकामी मदत होईल. अन्यथा महापालिकेला शहरात करोनाग्रस्त रुग्णांना आवर घालणे अवघड होऊन बसेल, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली आहे.
पवना धरणात १०० टक्के पाणी साठा असताना शहरात २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीकपात सुरू करण्यात आली. ही कपात दोन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर केली होती. त्यास ४ महिने उलटले तरी, ती कायम आहे. दुसरीकडे कोरोना आणि उन्हाळ्यामुळे पाण्याचा वापर वाढल्याने दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी होऊ लागली आहे. धरणात सध्या सुमारे ६० टक्के पाणीसाठा आहे. तरीही हेकेखोरपणे या पुढे ही पाणीकपात कायम राहणार आहे, असे पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. दिवसेदिवस उष्णता वाढत आहे. दुसरीकडे कोरोना विषाणू संसर्गामुळे बुहतांश नागरिक घरी बसून आहेत. नागरिकांकडून वारंवार हात धुण्यावर व स्वच्छतेवर भर दिला जात आहे. त्यामुळे पाण्याचा वापर वाढून मागणी वाढली आहे. परिणामी, दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी जोर धरत आहे. दररोज पाणीपुरवठा केल्यास नागरिकांना स्वच्छता बागळणे सुकर होईल. दिलेल्या मुदतीत पालिकेने पाण्याचे नवे स्रोत अद्याप सुरू केलेले नाहीत. पाणी शुद्धीकरण यंत्रणा अद्ययावत झालेली नाही. याला जबाबदार शहरातील नागरिक आहेत? असा सवालही उपस्थित केला आहे.
करोनाची साथ आटोक्यात आणावयाची असेल तर स्वच्छता महत्वाची आहे. महापालिका जेवढे पाणी शहराला देते, त्यात नागरिक स्वतःची स्वच्छता करणार की घरातल्या वस्तूंची स्वच्छता करणार. हा प्रश्न सर्वप्रथम महापालिका प्रशासनास पडायला हवा होता. थोडक्यात दुखापत हाताला अनं पट्टी गुडघ्याला असा हा प्रकार आहे. मुळात स्वच्छता राखण्याचा संदेश देणाऱ्या महापालिकेला तरी ही जाणीव सर्वप्रथम व्हायला हवी होती. परंतु, नागरिकांच्या आरोग्याचे कोणतेही सोयरेसुतक महापालिकेला नसल्याचे या कृतीतून स्पष्ट होते. नागरिकांच्या व शहराच्या भविष्याचा विचार करून महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा रद्द करावा. तसेच पूर्वीचा चोवीस तास पाणीपुरवठा पूर्वरत करावा. नसेल तर पुरेशा दाबाने तरी, शहरात पाणीपुरवठा व्हावा. – संतोष सौंदणकर (शिवसेना शहर संघटक, चिंचवड विधानसभा)















