न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२०) :- पुणे शहरात नव्याने आणखी दोन रुग्णांच्या कोरोना निदान चाचणीचा अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २३ वर जाऊन पोहचली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा ६३ झाला आहे.
नव्याने आढळलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांपैकी एकजण आयर्लंडला जाऊन आलेला आहे तर दुसरा रुग्ण हा देशाबाहेर कोठेही गेलेला नव्हता. भारती विद्यापीठात दाखल झालेल्या ४३ वर्षीय महिलेची कोरोना निदान चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. ही महिला परदेशात जाऊन आलेली नाही, तरी देखील तिला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पुणे शहरात आतापर्यंत एकूण ११ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, शुक्रवारपर्यंत राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ५२ होती. परंतु शनिवारी ती ६३ वर पोहोचली आहे. एका दिवसात राज्यात करोनाचे ११ रूग्ण वाढले आहेत. त्यापैकी ८ हे परदेश दौऱ्यावरून आलेले रूग्ण आहेत. तर ३ जणांना संसर्गामुळे करोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. ११ जणांपैकी १० जण हे मुंबईचे आहेत. त्यापैकी ८ हे परदेश दौऱ्यावरून आले आहेत. तर ३ जणांना करोनाची बाधा संसर्गातून झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चाचणी केंद्र वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांचीही भेट घेण्यात आली. त्यांनाही राज्यातील परिस्थितीचा आढावा देण्यात आल्याचं ते म्हणाले.















