- शहरात हे महाभाग होम क्वारंटाईनला जुमानत नसल्याचे धक्कादायक चित्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२०) :- शहरामध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून परदेशातून आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन केले जाते. मात्र, शहरातील उच्चभू समजल्या जाणाऱ्या भागांतून होम क्वारंटाईन केलेला एक सुशिक्षित व्यक्ती घरात न बसता बिनधास्तपणे फिरत होता. तोंडाला मास्क न लावता पत्नी आणि वडिलांसोबत मोटारीत फिरत असताना पालिकेच्या पथकाने त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन जबरदस्तीने भोसरीच्या रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्यापासून बचाव झाला आहे. होम क्वारंटाईनला जुमानत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.
शहरातील उच्चभ्रू एका नामांकित हाउसिंग सोसायटीतील हा सुशिक्षित व्यक्ती ३ दिवसांपूर्वी नॉर्वे देशातून आला होता. त्या व्यक्तीला होम क्वारंटाइनचा सल्ला पालिकेच्या डॉक्टरांनी दिला होता. मात्र संबंधित व्यक्ती घरात न बसता, सोसायटीच्या आवारात फिरत होती. मित्रमंडळींना घरी बोलावत होती. ही व्यक्ती मास्कचा वापर करत नसल्याबाबत सोसायटीच्या सदस्यांनी पालिकेकडे तक्रार केली होती.
पालिकेच्या ” फिल्ड सर्व्हलन्स टीम ‘ ने पाहणी केली असता, सदर व्यक्ती दोन वेळा घरी आढळून आली नाही. ती व्यक्ती पत्नी व वडिलांसह मोटारीतून शहरात फिरण्यास गेली होती. त्यापैकी एकानेही तोंडाला मास्क लावला नव्हता. त्यांना पालिकेच्या एफएसटी पथकाने शुक्रवारी ( दि . २० ) ताब्यात घेतले. सूचना करूनही होम क्वारंटाईन होत नसल्याने जबरदस्तीने भोसरीच्या रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. सोबत पत्नीलाही तेथे ठेवले आहे. तेथे सुरक्षारक्षकांसह पोलिस बंदोबस्त आहे. होम क्वारंटाईनचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.















