- नागरिकांनो ‘ बचाव हाच उपचार ‘ ही बाब गांभिर्याने घ्या – पांडाभाऊ साने…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात करोना या संसर्गजन्य विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूपासून स्वतःचा बचाव कसा करावा या संभ्रमावस्थेत शहरातील नागरिक आहेत. मात्र, तज्ञांनी या विषाणूला घाबरण्याची आवश्यकता नसून, हातांची स्वच्छता व तोंडाला मास्क लावून या विषाणूपासून स्वतःचा बचाव करता येतो, असे सांगितले आहे. मात्र, शहरात मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा आहे. त्यामुळे शहरातील बरेचसे नागरिक या सुविधांपासून वंचित आहेत. प्रभाग क्रमांक १ चिखली-मोरेवस्तीतील नागरिकही गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. प्रभागाचे नेतृत्व करणाऱ्या नगरसेवकांकडूनही याबाबतीत जनजगृती होताना दिसून येत नाही. अशाने हा जंतूसंसर्ग आणखी पसरण्याचा धोका आहे. हा संभाव्य धोका ओळखून भोसरी विधानसभेचे आमदार पै. महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतुन युवा नेते पांडाभाऊ साने यांनी प्रभागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनजागृती सुरु केली आहे. तसेच त्यांनी प्रभागातील नागरिकांसाठी स्वखर्चातून मोफत ‘ मास्क व सॅनिटायझर ’ चे वाटप घरपोच सुरु केले आहे. त्यांच्या या कृतीमुळे प्रभागात मास्क व सॅनिटायझर मोफत घरपोहोच करणारे ते शहरातील पहिलेच जनप्रतिनिधी ठरले आहेत.
युवा नेते पांडाभाऊ साने म्हणाले की, मागील काही दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात करोनाचे रुग्ण आढळले असून, शहरवासियांमध्ये काळजीचे वातावरण आहे. नागरिकांनी या आजाराची भीती बाळगू नये. करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील व परिसरातील शाळा, महाविद्यालयासह सर्व दुकाने तसेच कंपन्या, पानटपऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व बाजारपेठा बंद आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच महापालिकेने वारंवार केलेल्या सूचनांनुसार स्वच्छता राखणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच हस्तांदोलनही टाळवे, भारतीय नमस्कार करावा. अशा प्राथमिक गोष्टी नागरिकांनी कराव्यात. बाजारात मास्कचा तुटवडा आहे. गोरगरीब नागरिकांना मास्क व सॅनिटायझर मिळत नाहीत. माझ्याकडे याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या. कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यात डॉक्टरांसह सामाजिक कार्यकर्त्यांचीही भूमिका महत्वाची आहे. या भावनेचा आदर करीत, मी आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील जबाबदार नागरिक या नात्याने, चिखली-मोरेवस्ती परिसरातील नागरिकांसाठी स्वखर्चाने मोफत मास्कचे व सॅनिटायझरचे वाटप करण्यास सुरवात केली आहे.
राज्यात कलम १४४ लागू झाले आहे. पाचपेक्षा अधिक नागरिक रस्त्यावर दिसल्यास गुन्हा दाखल होत आहे. तसेच हा संसर्ग बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यासच होतो. त्यामुळे अनावश्यक गर्दीला फाटा देत, ज्या नागरिकाला मास्क व सॅनिटायझरची आवश्यकता आहे, त्याने ९८५०५०७००३/ ९७६४६४२००४ /९८२३६०६०१८ / ९०९६१०२१०८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून, त्यांचा कार्यालयात पत्ता नोंदवावा. आमच्या स्वयंसेवकामार्फत मोफत मास्क व सॅनिटायझर त्या गरजू नागरिकास घरपोहोच मिळेल. त्यामुळे एकमेकांकडून संसर्ग होण्याचा धोकाही नाही. या अभिनव उपक्रमास चिखली-मोरेवस्ती प्रभागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
कोरोना व्हायरस हा हवेद्वारे, शिंकण्यातून, खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून पसरतो. त्यामुळे आपले हात बाहेरून आल्यावर सातत्याने धुणे, शिंकताना, खोकताना नाका तोंडावर रूमाल धरणे, आपल्या बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श न करणे, अर्धवट शिजलेले कच्च मांस खाणे टाळावे, प्राण्यांपासून दूर राहणे, श्वसनसंस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहणे टाळणे आवश्यक आहे. तसेच कोरोनाची लक्षण आढळल्यास त्वरित जवळील रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी. राज्य शासनाने शहरात ३१ मार्चपर्यंत जनता कर्फ्यू लागू केला आहे. यादरम्यान सर्वांनी जनता कर्फ्यू चे पालन करावे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. ‘बचाव हाच उपचार आहे, ही बाब गांभिर्याने घ्यावी. नागरिकांनी आपत्कालीन व अत्यावश्यक सुविधेसाठी चिखलीतील आणि झेंडा चौकातील संपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहनही पांडाभाऊ साने यांनी यावेळी केले आहे.















