न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२०) :- कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपलब्ध यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी या आपत्कालीन परिस्थितीत सुक्ष्म नियोजन आणि व्यवस्थापनाची गरज असून महापालिका आणि पोलिस यंत्रणेने आपसात समन्वय ठेवून सक्षमपणे गतिमान कामकाज करावे, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेव्दारे कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शासनाकडून देखील याबाबत विविध सुचना आणि आदेश वेळोवेळी प्राप्त होत आहेत. या सुचनांची आणि आदेशांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आज पोलीस अधिकारी आणि महापालिका अधिकारी यांची समन्वय बैठक महापालिका मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडली. या बैठकीस मार्गदर्शन करताना आयुक्त हर्डीकर बोलत होते.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त अजित पवार, पोलिस उपआयुक्त सुनिल हिरेमठ, महापालिकेचे शहर अभियंता राजन पाटील, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, बाळासाहेब खांडेकर, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, प्रशांत जोशी, संदिप खोत, सीताराम बहुरे, स्मिता झगडे, हिंमतराव खराडे, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस उपनिरीक्षक आणि महानगरपालिका अतिक्रमण पथकातील कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. लोकांनी घरामध्ये रहावे, अकारण गर्दी करु नये आदी सुचना शासन तसेच महापालिकेने नागरिकांना सातत्याने दिल्या आहेत. कोरोना विषाणुचा फैलाव वाढू नये यासाठी सुरक्षात्मक उपाय म्हणून शासनाने जमावबंदी आणि संचारबंदी देखील लागू केली आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रत्येक यंत्रणेने जबाबदारीने काम केले पाहिजे असे आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले.
आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जात असताना नागरिकांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेवून त्याचे व्यवस्थापन करण्याचे काम पोलीस यंत्रणा आणि महापालिकेने करणे आवश्यक आहे. पोलिस अधिकारी कर्मचारी आणि महापालिका अधिकारी कर्मचारी यांनी स्वत:च्या आरोग्याची काळाजी घ्यावी असेही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
नागरिकांना आवाहन करताना आयुक्त हर्डीकर म्हणाले, कोणत्याही ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करताना व्यक्तीमध्ये सुरक्षित अंतर राखले पाहिजे. आवश्यकता नसल्यास घरा बाहेर पडू नये. आपल्या आरोग्याची काळजी
घ्यावी. यावेळी अतिरिक्त आयुक्त अजित पवार आणि पोलीस उपआयुक्त सुनिल हिरेमठ यांनीही उपस्थित अधिकारी कर्मचा-यांना मार्गदर्शन आणि सूचना केल्या.













