- जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२०) :- कोरोना या विषाणू संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने पुणे, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यात पेट्रोल / डिझेल विक्री करण्यास जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मनाई करण्याबाबत आदेश काढला आहे.
या आदेशात त्यांनी म्हटले आहे की, उपरोक्त विषयास अनुसरून कळविणेत येते कि, सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशाअंतर्गत कोरोना या विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवाशी भारतात या विषाणूचा सर्वत्र प्रवास करित आहेत. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूचे संसर्गात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे.
संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती पुणे जिल्ह्यात उद्भवू नये यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १९८७ दि. १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २ , ३ , ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. कोरोना विषाणूचा ( कोव्हीड – १९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूचे संसर्गात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणा-या दुचाकी / तीनचाकी / चारचाकी वाहनांमध्ये पेट्रोल भरणा करणेस मनाई करणेत येत आहे.
तथापि, अत्यावश्यक सेवेवर कार्यरत असणारे सर्व अधिकारी / कर्मचारी, कोरोना नियंत्रण व निर्मुलनासाठी कार्य करणा-या खाजगी व्यक्ती, अत्यावश्यक वस्तू व सेवा संदर्भात कार्य करणारी खाजगी व्यक्ती, वैद्यकिय उपचार किंवा सहाय्याची गरज असणारी व्यक्ती. याप्रमाणे ०१ ते ०४ बाबींना यातून सुट देणेत येत आहे. तथापी, सदर सूट देणेत येणा-या व्यक्तीने एकदाच टाकी पूर्ण भरून घेणे बंधनकारक आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे यांनी जिल्ह्यामधील वर नमूद ०१ ते ०४ व इतर आवश्यक असणा-या अधिकारी कर्मचारी व खाजगी व्यक्ती यांचे वाहनांना पेट्रोल डिझेल उपलब्ध करुन देणेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व विभागाकडून यादी संकलित करून त्याची शहानिशा करून त्याप्रमाणे पेट्रोल / डिझेल पंपधारकांना पेट्रोल / डिझेल भरणा करणेसाठी तात्काळ उपलब्ध करून देणेत यावी, असे या आदेशात त्यांनी म्हटले आहे.













