न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२०) :- निगडी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या प्राधिकरण पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख त्यांच्या घरासाठी किराणा साहित्य खरेदी करीत होते. त्यावेळी झोपडपट्टीतील एक वृद्ध महिला तेथून जात होती. घराबाहेर पडण्याचे कारण शेख यांनी विचारले.
‘माझ्या घरातील राशन संपले असुन उसने पैसे घेण्यासाठी जात आहे, असे महिलेने सांगितले. तसेच त्याचवेळी एक तृतीयपंथी देखील तेथून जात असताना त्यांनी त्याच्याकडेही विचारपूस केली. त्यावेळी त्याच्याकडील धान्य व पैसे संपल्याचे त्याने सांगितले. तसेच झोपडपट्टीतील प्रत्येक कुटुंबाची हीच परिस्थिती असल्याचे समोर आले.
त्यामुळे शेख यांनी त्यांना मदतीचा हात दिला. गहु, तांदुळ, तेल, टथपेस्ट, ब्रश, पीठ, साखर, चहापावडर, साबण आदी साहित्याचे एक किट तयार करून घेतले. प्राधिकरण पोलीस चौकीजवळील झोपडपट्टीतील ३५ कुटुंबांना शेख यांनी किराणा साहित्य दिले. त्यामुळे या झोपडपट्टीतील नागरिकांना दिलासा मिळाला असून, महामारीच्या संकटात पोलिसांतील माणसाचे व माणुसकीचे दर्शन घडले.













