- कोरोना वर्तुळ तोडण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची विक्री दिवसाआड करावी – विजय पाटील
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२०) :- आपल्या महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पुणे, मुंबई आणि नागपूर ह्या प्रमुख शहरांमध्ये कोरोना लागण झालेल्यांची संख्या लक्षणीय वाढलेली आहे. दुर्दैव्याची गोष्ट म्हणजे आपले राज्य हे संपूर्ण देशामध्ये या भयावह रोगाचे केंद्र बनले आहे. मानवकल्याण हेतू या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीविरुद्ध जगातील सर्वच देश एकवटलेले दिसून येत आहेत. शहरात गेल्या चार दिवसांपासून लॉक डाऊन सुरू असून कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासन जीवाची बाजी लावून कार्यरत आहे. त्याला आपल्या शहरातील काही रहिवाशी मात्र बेफिकररीने हरताळ फासत आहेत. त्यांच्या या वागण्याने ते स्वतःचे व इतरांचेही जीवन धोक्यामध्ये आणत आहेत. हा आजार मानव ते मानव असा पसरतो व सरळ सरळ श्वसन यंत्रणेवर त्याचा थेट हल्ला होत असल्याने त्याचे वर्तुळ तोडणे हाच सद्यस्थितीत एकमेव उपाय आहे. त्यासाठी येणारे हे एकवीस दिवस हे भारतीयांसाठी अग्निपरिक्षेचे असणार आहेत. यावर आपण सर्वांनी जबाबदारीने घरामध्येच सुरक्षित राहणे गरजेचे आहे.
असे असताना मात्र शहरातील अनेक रहिवाशी नागरिक संध्याकाळच्या सुमारास चौका-चौकामध्ये मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. कोरोना आजाराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असतांनाही काही जण मात्र समाज विघातक असे कृत्य बिनधास्तपणे करीत आहेत. शेकडो च्या संख्येने बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. बहूतांशी भाजी विक्रेते, किराणा माल विक्रेते हे सुद्धा “सोशल डिस्टसिंग” चे पालन करताना दिसून येत नाहीत. ही आपल्या शहरासाठी धोक्याची घंटा आहे. अश्या वागणुकीमुळे शहरात कोरोना नियंत्रण करणे अवघड ठरू शकते.
जेष्ठ नागरिक आणि मुलांना घराबाहेर पडण्यासाठी पूर्ण निर्बंध घालावेत. मास्कशिवाय अजिबात घराबाहेर पडू नये, अत्यावशक सेवा वगळून दुचाकी व तीनचाकी वाहनांना रस्ता प्रवेश वर्जित करावा, किराणा माल व भाजीपाला दुकानं ही दिवसाआड पद्धतीने उघडावी, पालिका हद्दीत प्रभागवार सम आणि विषम पद्धत आमलात आणावी. विनाकारण फिरणाऱ्यांवर मारहाण न करता दंड बैठका चा उपाय अवलंबावा व नोटिस बजावून, पुन्हा विनाकारण रस्त्यावर दिसल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात यावा.
प्राधिकरण परिसर हा शैक्षणिक हब असल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या आहे. या ठिकाणीही ही युवा मंडळी नियम धाब्यावर ठेवत आहेत. त्यांच्या संकुल प्रमुखांना व सुरक्षा प्रमुखांना या संदर्भात लेखी नोटिसा बजवाव्यात. नियम तोडणाऱ्यां विक्रेत्यांना परवाना रद्द करण्याबाबत नोटीस बजवावी. मास्क न घालता रस्त्यावर येणाऱ्या व्यक्तीसाठी भरारी पथकाची नियुक्ती करावी व जागेवर आर्थिक दंडात्मक कारवाई करावी व तो जमा झालेला निधी पंतप्रधान आपत्ती कोशात जमा करावा तरच या संध्याकाळच्या गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल. अन्यथा पुण्यास भीषण संकटास सामोरे जावे लागेल. यात शंका नाही. याकरिता आपत्कालीन व्यवस्थापनबाबत प्रशिक्षण झालेल्या स्वयंसेवकांची अधिकृतपणे मदतही घेता येईल. दोन पोलीस कर्मचारी, दोन स्वयंसेवक व एक पालिका कर्मचारी अश्या पाच जणांची टीम भरारी पथकासाठी नियुक्त केली जाऊ शकेल. सद्यपरस्थितीत या सूचनांची गंभीरपणे दखल पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व पोलीस आयुक्त या सर्वांनीच घेणे आवश्यक आहे. अश्या पद्धतीनेच लॉकडाऊन यशस्वी करता येणे शक्य आहे. अन्यथा कोरोना संक्रमणाचा धोका कायम राहील व लॉकडाऊन ची तारीख पुन्हा जून महिन्यापर्यंत वाढवावी लागेल.
– विजय पाटील ( अध्यक्ष – प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती)













