- आज रात्री मध्यरात्रीपासून शहराच्या सर्व सीमा पोलिसांकडून सील…
- वाचा.. या कालावधीत काय सुरु राहणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील १० दिवसामध्ये कोरोना कोविड – १९ रुग्णाची संख्या मोठया प्रमाणावर वाढत आहे. तसेच लगतच्या पुणे शहरात देखील रुग्ण संख्या मोठया प्रमाणावर वाढलेली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात स्थानिक प्रसार स्टेज न रहाता सामुदायिक प्रसार ( Community Transfer Stage ) सुरू होण्याची शक्यता असल्याने वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी शहरातील नागरिकांच्या हालचालीवर, बाहेर फिरण्यावर मर्यादा आणण्याकरीता संपुर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रास कंटेनमेन्ट झोन घोषित करणे बाबतचे अधिकार आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ अन्वये आयुक्त, पिंपरी चिंचवड महानरपालिका यांना असल्याने व कोविड – १९ बाधित रुग्णाची संख्या वाढण्याचे व नियंत्रणाबाहेर जाण्याचे शक्यता नाकारता येत नसल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील संपुर्ण भाग रविवार दिनांक १९ एप्रिल २०२० रात्री १२ : ०० वाजले पासून कंटेनमेन्ट झोन म्हणून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज घोषित केला आहे.
त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या सर्व सीमा व शहरातून बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे. त्यानुसार संबधीत पोलिस प्रमुख हे या भागाच्या हद्दी सील करतील हे आदेश दि. २७ एप्रिल २०२० पर्यंत लागू राहणार आहेत. तदनंतर परिस्थितीचा आढावा घेवून जनतेच्या व्यापक हिताचा विचार करुन उचित निर्णय घेण्यात येईल.
” कोरोना ” विषाणू प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने लागू केलेला लॉकडाउन केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेश क्र ४० – ३ / २०२०DM – IKA ) दिनांक १५ एप्रिल २०२० अन्वये ३ मे पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १७ एप्रिल २०२० च्या आदेशान्वये दिनांक २० एप्रिल पासून काही सवलती जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यानसार पिंपरी चिंचवड शहरात सदर सवलतीची अंमलबावणी केल्यास नागरिकांचे सार्वजनिक ठिकाणी जाणे – येणे वाढून कोबिड – १९ च्या रुग्णामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पिंपरी चिंचवड हे आद्योगिक शहर असून ते पुणे महानगरपालिका क्षेत्रास लगतच आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र आणि पुणे शहर यामधील नागरिक आणि प्रशासन यांचे मध्ये दैनंदिन दळणवळण, प्रशासकीय व्यवहार तसेच भाजीपाला आणि जिवनावश्यक सामानाची वाहतूक इत्यादी बाबतीत मोठया प्रमाणात व्यवहार होतात. राहणारे नागरिक त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी, नोकरी व्यवसाया निमित्त पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जातात तसेच पिपरा चिंचवड महानगरपालिका हद्दीतील तसेच लगतच्या चाकण , हिंजवडी येथील औद्योगिक वसाहतीतील काम करणारे अनेक नागरिक पुणे शहरातून नियमित येणे – जाणे करतात.
सद्यस्थिती मध्ये पुणे व पिंपरी चिंचवड शहरात कोविड – १९ चे रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीत पिंपरी चिंचवड मनपा हद्दीत विविध आस्थापनांना आणि उद्योगांना दिनांक २० एप्रिल नंतर कामकाजाबाबत सवलती उपलब्ध करुन दिल्यास त्याठिकाणी नियुक्त असलेल्या नागरिकांचे येणे जाणे व संपर्क वाढणार आहे. परिणामी पिंपरी चिंचवड शहरातील सद्यस्थितीत कोविड – १९ बाधित रुग्णाची संख्या वाढण्याची व नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र शासनाचे आदेश दिनांक १७ / ०४ / २०२० मधील मुद्दा क्र. ३ अन्वये राज्यातील कोविड – १९ हॉटस्पॉट निर्माण झालेल्या शहरात म्हणजेच ज्या शहरात कोविड – १९ हे रुग्ण एकाच भागात मोठया संख्येने आढळून आलेले आहेत. सदर रोगाचा उद्रेक झालेला आहे, अशा शहरात कटेनमेंट झोन निश्चीत करण्याचे अधिकार आयुक्त, महानगरपालिका यांना दिलेले आहेत. त्यानुसार हे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.
तथापि, सदर आदेशातून कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, पोलिस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागांचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणा-या कर्मचारी व वाहनांना वगळण्यात येत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तू यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतूक सदरच्या आदेशातून वगळण्यात येत आहे.
१. नमुद प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या बँकींग सुविधांसाठी सर्व बँकांनी शाखा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०:०० ते ०२:०० या वेळेत सुरु ठेवाव्यात तसेच आपली ए. टी. एम. केंद्रे कार्यान्वीत ठेवावीत.
२. सदर काळात सकाळी १० : ०० ते दुपारी ०२ : ०० या कालवधीतच दुध, भाजीपाला फळे यांची किरकोळ विक्री सुरु राहील. सदर विक्री मनपा मार्फत दिलेल्या आदेश क्र. भूजि / ०२ / कावि / २१० / २०२० दि . १५ / ०४ / २०२० व भूजि / ०२ / कावि / २२५ / २०२० दि . १७ / ०४ / २०२० नुसार निश्चित केलेल्या जागांवरच अनुज्ञेय राहिल. त्याव्यतीरिक्त उर्वरित कालावधी मध्ये विक्रीस प्रतिबंध राहील, घरपोच भाजीपाला व फळे विक्री ही मनपाच्या पूर्व मान्यतेनुसारच अनुज्ञेय करण्यात येईल.
३. सदर काळात मटण व चिकन यांची किरकोळ विक्री या पूर्वी मनपाने दिलेल्या आदेश क्र. भूजि / ०२ / कावि / २२० / २०२० दि . १६ / ०४ / २०२० नुसार सकाळी १० : ०० ते दुपारी ०२ : ०० या कालवधीतच सुरु राहिल.
४. सदर काळात अत्यावश्यक इतर सामान जसे अन्न धान्य, जीवनावश्यक वस्तू यांची किरकोळ विक्री सुद्धा सकाळी १० : ०० ते दुपारी ०२ : ०० या कालवधीतच सुरु राहिल.
५. जीवनावश्यक वस्तूंचे, औषधांचे व तयार अन्न पदार्थाचे घरपोच वाटप सकाळी ८ : ०० ते रात्री १० . ०० या कालवधीतच मनपाच्या पूर्व मान्यतेने पास घेवन अनुज्ञेय राहिल. सदर सुविधेकरीता फक्त मनपाच्या अधिका-याव्दारे निर्गमीत करण्यात आलेला पास ग्राहय धरण्यात येईल.
६. शहरातील सर्व इस्पितळे, दवाखाने व औषधी दुकाने संपुर्ण कालावधी करीता खुली राहतील.
७. अत्यावश्यक सेवांकरिता यापर्वी पोलिसांमार्फत देण्यात आलेले पास दि. २२ एप्रिल पर्यंतच लागू रहातील. यानंतर मनपा मार्फत नव्याने पास घेणे संबंधीत आस्थापनांना बंधनकारक राहिल. पास देण्या संदर्भात पिंपरी चिंचवड मनपा मार्फत वेगळ्याने आदेश निर्गमित करणेत येतील.
८. मनपा मार्फत लागू करणेत आलेल्या स्थानिक क्षेत्र Containment Zone म्हणून निश्चित करून सील बंद केलेचे आदेश प्रभावीत Cluster म्हणून पूर्वी प्रमाणेच लागू राहतील.
९. शासकीय कार्यालयांना आवश्यक कर्मचा-यांसाठी आवश्यक पास मनपा मार्फत उपलब्ध करून दिले जातील. याकरिता संबंधीत आस्थापनेचे विभाग प्रमुख शासनाच्या निर्देशाप्रमाणे आवश्यक कर्मचा-यांची सूची प्रमाणित करून मनपा कार्यालयास सादर करतील.
१०. मोशी कृषि उत्पन्न बाजार समिती बाबत मा. विभागीय आयुक्त, पुणे यांनी पारित केलेले आदेश कायम लागू राहतील. बाजार समितीतील व्यवहारांना सदरच्या आदेशामधून वगळण्यात येत आहे.


















