- शहर संक्रमणशील क्षेत्र जाहीर झाल्यामुळे नवीन १० पॉइंटवर नाकाबंदी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी पोलीस ठाण्याच्या परिसरात आज मॉर्निंगवॉकसाठी आलेल्या १०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील ९४ जणांना सक्त ताकीद देऊन सोडण्यात आले तर इतर व्यक्तींवर १८८ नुसार कारवाई करण्यात आली. पोलिसांची ही शहरात सलग तिसरी कारवाई आहे.
आज सोमवारी सांगवी पोलीस ठाण्याच्या परिसरात मॉर्निंगवॉकसाठी आलेल्या जवळपास शंभर नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली. या नागरिकांना एका ठिकाणी बसवले तर यातील काहींना लाठ्याचा प्रसादही मिळाला. काही जणांना कडक शब्दात समज देण्यात आली.
दरम्यान शहर संक्रमनशील क्षेत्र जाहीर झाल्यामुळे पोलिसांनी नाकाबंदीत वाढ केली आहे. नवीन १० पॉइंटवर नाकाबंदी लावण्यात आली असून, प्रत्येक पॉईंटवर एक अधिकारी, पोलीस ठाण्यात तीन कर्मचारी आणि वाहतूक विभागाचे दोन कर्मचारी असा बंदोबस्त असणार आहे. दरम्यान अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची वाहतूक सुरू राहणार असून त्याचेही रेकॉर्ड नाकाबंदी दरम्यान ठेवले जाणार आहे.


















