पिंपळे सौदागर परिसरात गोरगरिबांना केले अन्नाच्या पाकिटाचे वाटप; ग्रामस्थांकडून कौतुक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२०) :- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी रोजंदारी, मोलमजूरी व दैनंदीन काम करणा-या कष्टक-यांना मदत पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मदतीसाठी आवाहन करा, अशा सूचना राज्यातील स्थानिक पदाधिका-यांसह पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना केल्या आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, दररोज कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यातच आता लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविण्यात आल्यामुळे शहरातील गोरगरीब, हातावर पोट असणारे मजूर, कामगार हातघाईला आले आहेत. त्यांना दोन वेळचे जेवण मिळणे देखील दुरापास्त झाले आहे. या अनुषंगाने कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते धावून येत आहेत.
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी पक्षनेत्यांच्या आदेशाचे पालन करीत, पुढे येत परिसरातील गोरगरीब, हातावर पोट असणारे मजूर व कामगारांना अन्नाच्या पाकिटाचे नुकतेच वाटप केले. तसेच परिसरात औषध फवारणी, मास्क वाटप, धान्याचे कीट आदी उपक्रम परिसरात सुरु केले आहेत.
याबाबत बोलताना काटे म्हणाले की, एक सामाजिक जबाबदारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य व केंद्राच्या सहाय्यता कार्यास हातभार लागावा, या हेतूने राज्य विधिमंडळातील विधानसभेचे व विधान परिषदेचे सदस्य यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तसेच संसदेतील लोकसभा व राज्यसभा सदस्यांचे एक महिन्याचे वेतन प्रधानमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय आमचे नेते शरद पवार साहेबांनी घेतला. या आदेशाचे अनुसुरण करून, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनीदेखील मार्च महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहे. त्यातून रोजंदारी, मोलमजूरी व दैनंदीन काम करणा-या कष्टक-यांना मदत पोहोचविली जाणार आहे.
पिंपळे सौदागर हा परिसर जरी स्मार्ट असला तरी, त्या ठिकाणी राहणाऱ्या काही गोरगरिबांची परिस्थिती हलाखीची बनली आहे. त्यामुळे पिंपळे सौदागर परिसरातील गोरगरीब, हातावर पोट असणारे मजूर व कामगारांना अन्नाच्या पाकिटाचे वाटप केले. तसेच परिसरात लॉक डाऊनच्या कालावधीत गोरगरिबांना जमेल तशी मदत करीत आहेत. याकामी स्थानिक कार्यकर्त्यांची मदत होत आहे. कोरोनाचा प्रतिबंध व्हावा यासाठी परिसरात औषध फवारणी, गोरगरिबांना जीवनावश्यक तसेच अत्यावश्यक मदत करीत कोरोना हटावसाठी विशेष प्रयत्नदेखील सुरु आहेत.
त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.


















